कोल्हापूर येथील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहाला भीषण आग लागली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. ऐतिहासिक नाटय़गृह आणि खासबाग कुस्ती मैदानाचे व्यासपीठ आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे नाटय़कलावंतांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या नाटय़गृहाला मोठी परंपरा आहे. राज्यभरातील कलावंत, रसिकांसाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. गुरुवारी रात्री शॉर्टसर्किट पिंवा जनरेटरच्या स्पह्टाने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग एवढी भीषण होती की खासबाग मैदानाचे व्यासपीठ आणि शेजारी असलेले नाटय़गृह भक्ष्यस्थानी पडले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 8 ते 9 बंब दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
नाटय़कलावंत, रसिक हळहळले
संगीतसूर्य केशवराव भोसले यांची उद्या 9 ऑगस्टला जयंती आहे. जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच नाटय़गृहाला आग लागल्याने कलावंत आणि रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचलनालयाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन 9 आणि 10 ऑगस्टला याच नाटय़गृहात केले होते.
कुस्तीपंढरी अशी कोल्हापूरची ओळख आहे. ऐतिहासिक खासबाग मैदानालाच आग लागल्याने कुस्तीशौकिनांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.