हल्लीच्या फ्रीजना डीफ्रॉस्ट का करावे लागत नाही ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रतिकात्मक

तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होत असून घरामध्ये रोजच्या वापराच्या वस्तूंमध्येही बदलत्या तंत्रज्ञानानुसार बरेच बदल झाले आहेत.  80-90 च्या दशकात घरातील फ्रीजमध्ये असलेल्या फ्रीजरमध्ये आतून बर्फाचे थर साचायचे. ते दूर करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत होती.  मात्र हल्ली हा त्रास कोणाला जाणवत असल्याचं ऐकीवात नाही. फ्रीजमध्ये असे नेमके काय बदल झाले ज्यामुळे हा त्रास संपला हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे.

फ्रीजमध्ये असलेल्या शितलक  म्हणजेच refrigerantचे वहन करणार्‍या कॉईलवर कालांतरानं हवेतलं बाष्प जमा होतं. याच बाष्पाचा पुढे बर्फ बनतो. ह्यामुळे दोन प्रकारचे अडथळे निर्माण होतात पहिला म्हणजे उष्णता वहनातील अडथळा (बर्फ उष्णतेचं अवरोधक (insulator) आहे) आणि दुसरा म्हणजे कॉइलवरुन वाहणार्‍या हवेच्या मार्गातले निर्माण झालेले अडथळे. या दोन कारणांमुळे उष्णता वहनाची कार्यक्षमता मंदावते ज्यामुळे फ्रीजचा काँप्रेसर जास्त वेळ चालतो, जास्त वीज ‘खातो’. डीफ्रॉस्ट यंत्रणेमध्ये साचलेला बर्फ वितळवून यंत्रणेच्या बाहेर काढून टाकला जातो. यालाच आपण फ्रीज डिफ्रॉस्ट करणे असं म्हणतो. या प्रक्रियेमुळे  फ्रीजमधील यंत्रणेची कार्यक्षमता परत पुर्वपदावर येते.

Quora या प्रश्नात्तरांच्या मंचावर निवृत्त उद्योजक असलेल्या प्रकाश नाडगौडा यांनी हल्लीच्या फ्रीजमध्ये बर्फ का साचत नाही या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय की  ’70 च्या दशकांत फ्रिज बटन दाबून डिफ्रॉस्ट करावे लागत होते. बर्फ वितळवण्यासाठी गरजेची असलेल्या तारांची वेटोळी ही फ्रिजच्या वरच्या भागात असतात.  या तारांच्या खालच्या बाजूला फ्रीजरचा कप्पा असायचा आणि त्याखाली डिफ्रॉस्ट ट्रे असायचा. या ट्रे खाली फ्रीजचे मोठे कप्पे असायचे.  अशा रचनेला direct cooling -single door संबोधतात.’

नाडगौडा यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलंय की “आमच्याकडे पहिला फ्रीज अवतरला थो 1976 साली. ऑल्विन कंपनीच्या या फ्रीजने पुढे 30 वर्षे विनातक्रार सेवा दिली”, हा फ्रीज पुढेही व्यवस्थित चालला असता मात्र नाडगौडा कुटुंबाने त्याला रजा दिली होती.  या फ्रीजबाबत बोलताना नाडगौडा म्हणतात की दर 10-15 दिवसांनी फ्रिज 6-8 तास बंद ठेवावा लागत असे.  असं केलं तरच आत जमा झालेला बर्फ वितळत असे आणि फ्रीज पुन्हा पूर्ण क्षमतेने काम करायला लागत असे. फ्रीज बंद ठेवल्याने एव्हॅपोरेटर कॉईलवर जमा झालेला बर्फ वितळतो आणि त्याचं पाणी फ्रीजर खालच्या ट्रेमध्ये जमा होतं.  हे पाणी बाहेर काढून फेकून द्यावं लागायचं.  नाडगौडा  त्यांच्या उत्तरात म्हणतात की ‘ पाणी न सांडता हा पसरट ट्रे अलगद बाहेर काढण्याचतही कौशल्य होतं ‘

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फ्रीजमध्ये स्वत:हून डीफ्रॉस्टचे काम करणारी प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली. नाडगौडा यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलंय की अॅटोमॅटीक डीफ्रॉस्ट यंत्रणा ही एव्हॅपोरेटर कॉईलवर गरम हवा, पाण्याचा झोत फेकणे किंवा गरम गॅस एक्सपान्शन व्हॉल्वमधून न सोडता तो एव्हॅपोरेटरमधे धाडणे. असं असलं तरी यासाठी फ्रीजच्या रचनेत बदल करणं गरजेचं होतं कारण एव्हॅपोरेटर कॉईल आतमध्ये बसवता येणार नव्हती.  म्हणजेच फ्रिजसाठी बाहेरुन शीतकरणाची यंत्रणा बसवणं गरजेचं होतं.  अशा रितीने बाजारामध्ये बाहेरून फ्रीज थंड indirect cooling ची योजना असलेले फ्रिज आले ज्यामुळे आपल्याला हल्ली फ्रिज डिफ्रॉस्ट करावा लागत नाही कारण तो  आपल्या न-कळत डिफ्रॉस्ट होत असतो.