गृहउद्योग

>> अपूर्वा समर्थ पालकर

अपूर्वा पालकर. घरातून केक्स, चॉकलेट्स करून आज छोटय़ाशा गृहउद्योगाला बऱ्यापैकी आकार आला आहे.

माझं शिक्षण बी.कॉमपर्यंत झालं. लग्न होईपर्यंत नोकरी करत होते. लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहिले त्यामुळे नोकरी करता आली नाही. खरं सांगायचे तर आपलं करिअर, छंद, घर, नवरा, मुलंबाळ या साऱयांच्या पलीकडेही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काहीतरी वेगळे करता यावे असा विचार मनात नेहमीच घोळत असायचा. मला दोन मुले, पती शिक्षक आहे. ते स्वतःचे क्लासेस घेतात. काही वर्षांनी आम्ही दादरला राहायला आलो त्यामुळे मला खूप वेळ मिळू लागला. तेव्हा एकदिवस वर्तमानपत्रात ‘केक क्लासेस’ची जाहिरात पाहिली. मी या क्लासमध्ये जायचे ठरवले त्याप्रमाणे प्रथम केक बनवायला शिकले. नंतर चॉकलेट्सही बनवायला शिकले.

चॉकलेट्स, केक व्यवस्थित बनवायला येऊ लागल्यावर हळूहळू ते बनवून देण्याच्या ऑर्डर्सही घेऊ लागले. हे शिकल्यानंतर लहान मोठय़ा पर्सेसही बनवायला शिकले. हळूहळू त्याच्याही ऑर्डर्स येऊ लागल्या. स्लिंग बॅग, बटवे, मोबाईल कव्हर, मोठय़ा पर्सेस, ब्लाऊज कव्हर अशा वेगवेगळ्या प्रकारातल्या बॅगांची मागणी माझ्याकडे येत असते. घर सांभाळून मुलं शाळेत गेली की मी ही कामं करते.

सध्या मी गणपतीमध्ये घरगुती मोदक तयार करते. माझी ही कल्पना अनेकांना आवडली. यामध्ये चॉकलेट मोदक, वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे मोदक, ड्रायफ्रुट्सचे मोदक मी बनवते. अनेकजण नातेवाईकांकडे जाताना चॉकलेट मोदकाचे बॉक्स आणि चॉकलेट्स घेऊन जातात. तसेच दिवाळीतही माझ्याकडे बऱयाच ऑर्डर्स असतात. वाढदिवसाच्या दिवशी ग्रााहकांच्या मागणीनुसार केकही बनवून देते. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाबहिणीला भेट देण्यासाठी चॉकलेट्सचे वैशिष्टय़पूर्ण पॅक मी तयार केले आहेत. यासोबत घरगुती कार्यशाळाही घेते. हे सगळं करत असताना नवीन केक, चॉकलेट्स बनवायला शिकणं किंवा त्यामध्ये नवनवीन प्रयोग करणं सुरूच असतं. त्याकरिता पुस्तकं वाचते, इंटरनेटची मदत घेते. मी आता माझी स्वतःची कंपनीही सुरू केली आहे. त्याचं नाव आहे ‘vi-vish’.

या सगळ्या कला शिकत असताना मला माझ्या घरच्यांची नेहमीच साथ मिळाली. प्रोत्साहनही मिळाले. म्हणूनच मी कॅनरा बँकेच्या कॅनबजार प्रदर्शनात तसेच वनितामंडळ सभागृहात माझे स्टॉलही लावू शकते. नुकत्याच झालेल्या कॅनरा बँकेच्या कॅनबाजार प्रदर्शनात भाग घेतला आणि त्यात मी बनवलेल्या केक पॉक्स या पदार्थाला ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट’ हा सन्मान मिळाला. प्रत्येक स्त्री अशा पद्धतीने स्वतःची कला जोपासू शकते आणि संसाराला हातभार लावू शकते असं मला वाटतं. आपण करत असलेल्या कामामध्ये सतत नावीन्य आणण्यासाठी मला काय करता येईल याचा शोध घेतल्यामुळेच मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला शिकून स्वतःचा उद्योग उभा करू शकले. अर्थात याकरिता मला माझ्या पतीचीही भरपूर साथ मिळते.

चॉकलेटस, केक या खाद्यपदार्थांमध्ये सतत वेगवेगळे बदल होत असतात. ते बदल लक्षात घेणं, त्याची माहिती करून घेणं आणि त्याप्रमाणे ते स्वतः बनवायला शिकणं गरजेचं असतं. तरच आपण ग्राहकांना आकर्षित करू शकतो. हे या उद्योगात माझ्या लक्षात आलं. हा आपला उद्योगासाठी सतत करायचा एक अभ्यास आहे. त्यामध्ये वेगळेपण आले तरच आपल्याला एखादा वेगळा पदार्थ बनवताना आनंद मिळू शकतो. सध्या मी बाजारात अशा प्रकारच्या होणाऱया नव्या बदलांवर लक्ष देत आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या