नितळ देखणं नेपाळ – शिल्पा तुळसकर – विशाल शेट्टी.

468

खूप वर्षांपूर्वीचा नेपाळचा मधुचंद्र अजूनही तसाच टवटवीत आणि प्रसन्न आहे.

मधुचंद्र म्हणजे? मला वाटतं ही फार जुनी कॉन्सेप्ट होती जी खूप छान होती. कारण त्यावेळी जुळवून लग्न केलेली असल्याने नवरा-बायको फारसे एकमेकांना ओळखायचे नाहीत. त्यामुळे एकमेकांसोबत घालवलेले निवांत क्षण म्हणजे मधुचंद्र.

फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? त्यावेळी आम्ही माहीमसारख्या ठिकाणी नवीन घर घेतलं होतं, त्यात लग्नाचाही खर्च बराच झाला होता. त्यामुळे फिरायला न जाण्याचे आम्ही ठरवले होते. पण त्यावेळी माझी आई बोलली की तुम्ही नंतर फिरायलाही जाल, पण मधुचंद्र परत होणार नाही. चार दिवस लोणावळय़ाला गेलात तरी फरक पडणार नाही. पण तुम्ही जा. आम्ही ते ऐकलं. आम्ही दोघांनीही मिळून नेपाळला जाण्याचे प्लॅनिंग केलं होतं.

तिथे आवडलेले ठिकाण? तिथे पोखऱयाला ‘ताज’ची प्रॉपर्टी आहे ‘फिश टेल लाँज’. ही फाईव्ह स्टार प्रॉपर्टी होती आणि ती लकीली आमच्या त्या पॅकेजमध्ये आली होती. छोटी लाकडी कॉटेजेस आहेत आणि ती एका तलावाच्या मध्ये आहेत. ते फार सुंदर ठिकाण होतं.

ठिकाणाचे वर्णन – फार-फार प्रेमळ माणसं आणि हिंदुस्थानपेक्षा वेगळं नाही. पण इतकी स्वच्छ मनाची माणसं की ते त्यांच्या चेहऱयावर पण दिसतं. नागरकोट म्हणून काठमांडूच्या जवळ छोटंस हिल स्टेशन आहे. तिथे मी अतिशय सुंदर दिसणारी मुलगी मासे तळताना पाहिली आहे. ती नेपाळी मुलगी होती. इतकी सुरेख होती की आजही मला तिचा चेहरा डोळय़ांसमोर स्पष्ट दिसतोय. साधारण सतरा-अठरा वर्षांची असेल. तिच्या ध्यानी मनीही नसेल आणि कल्पनाही नसेल की आपण किती सुंदर आहोत. सगळय़ा अर्थाने स्त्र्ााr म्हणूनसुद्धा, चेहरासुद्धा तिचा फार छान होता.

तिथे केलेली शॉपिंग – तिथे मॅरिजुआनाचे शेत आहे. त्याची रोपं असतात ती रोपं वाळल्यानंतर त्याच्या बॅग बनवतात. त्या मी आणल्या होत्या आणि जवळपास पंधरा ते सोळा वर्षे त्या वापरल्या. इतक्या छान होत्या. तिथे मनकामना देवीचे मंदिर आहे. ते अगदी टेकडीवर मंदिर आहे. तिथून आम्ही रुद्राक्षाची माळ घेतली होती. ती अजूनही माझ्या देव्हाऱयात आहे.

मधुचंद्र हवाच की… – अगदीच हवा. कारण तुम्ही एकत्र कुटुंबात राहा, नका राहू हे जे काही चार-पाच दिवस असतात ते कायम लक्षात राहातात. तुम्ही जेव्हा कधी प्रवास करता तर एक प्रवास तुम्हाला खूप काही शिकवून जातो. खूप काही. तो कुठेही असूदे मग. एका घरात एकत्र राहणं आणि प्रवासात एकत्र राहणं मग आपला जोडीदार असो, मैत्रीण असो किंवा कोणीही असूदे हा एक वेगळा अनुभव असतो. लग्नानंतरचे ते क्षण पुन्हा येत नाहीत. विशाल आणि मी अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होतो तरीही आमच्या कायम लक्षात राहिले ते लग्नानंतरचे नेपाळमधले चार-पाच दिवस. त्यानंतर आई-वडिलांचे आजारपण, मुलांचा जन्म या सगळय़ात आम्ही इतके व्यस्त झालो की, सरळ दहा वर्षांनी एकटय़ाने प्रवास केला. त्यामुळे खूप आनंद आहे की, त्यावेळी आईचे ऐकून आम्ही फिरायला गेलो.

एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत… – हे प्रत्येक जोडप्यावर अवलंबून आहे. आम्ही लग्नाआधी एकमेकांना ओळखत होतो, पण एकंदर जवळीक वेगळय़ा प्रकारची असल्याने सेन्स ऑफ बिलाँगिंग येतं. हा माणूस आपला आहे आणि आपण या माणसाचे आहेत. यावर शिक्का बसला आहे हे फार समाधानकारक असतं. त्याची गंमत वेगळी असते. हा फरक इतकी वर्षे आम्ही एकत्र होतो तेव्हा नाही, पण लग्नानंतर जाणवला.
तिथे आवडलेला खाद्यपदार्थ – मोमोज, नेपाळी कुझिन्स.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम? दोन्ही. अनोळखी ठिकाणीही जिथे रोमॅन्टिसिझम फुलेल तो खरा रोमॅन्टिसिझम.
जोडीदाराची खास आठवण? देवीच्या मंदिरात जाताना आम्हाला केबल कारने जावे लागले. माझ्या नवऱयाला उंचीची भीती वाटते. तो केबल कारमध्ये बसल्यावर अजिबात हलला डुलला नाही, तो बसला आणि मी एकटीच बडबड करत होते. नंतर काही वेळाने माझ्या लक्षात आले अरे, याला उंचीची भीती वाटते. त्याच्यातून जाताना त्याने एक शब्द काढला नाही किंवा त्यातून आपण नको जाऊया असेही बोलला नाही, पण माझ्यासाठी तो आला.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – विशाल बऱयापैकी लाजराबुजरा आहे. तो कुठलीही गोष्ट फार ग्रेसफुली घेतो. त्याच्या डोळय़ांत माझ्याविषयी अभिमान दिसतो. अबोल असला तरी आम्ही दोघं फार गप्पा मारू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या