
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना इतिहास पुन्हा लिहिण्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतिहास कोणी कसा बदलू शकतो? इतिहास हा इतिहास असतो, असे म्हणत नितीश कुमार यांनी अमित शहा यांना टोला लगावला.
सोमवारी जनता दरबारमध्ये बिहारचे नितीश कुमार यांना अमित शहा यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्यांनी इतिहास पुन्हा लिहिण्याची काय गरज आहे? इतिहास कोणी कसा बदलू शकतो? असा सवाल उपस्थित केला. तसेच मला एक समजत नाही की इतिहास कोणीही बदलू शकत नाही. भाषेचा मुद्दा वेगळा आहे, परंतु इतिहास हा इतिहास आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बिहारमध्ये भाजप आणि जदयूची सत्ता आहे. मात्र गेल्या काही काळापासून दोघांमध्ये अनेक मुद्द्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. कलम 370, सीएए-एनआरसी सारख्या आणि जनगणनेच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. अशातच नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी जवळीक साधत असल्याचीही चर्चा आहे.
काय म्हणाले होते शहा?
हिंदुस्थानातील बहुतांश इतिहासकारांनी केवळ मुघलांचीच चर्चा केली असून पांड्य, चोला, मौर्य, गुप्त आणि अहोम राज्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले. पांड्य राजवट 800 वर्ष होती. आसामची अहोम राजवट 650 वर्ष होती. पल्लव साम्राज्य 600 वर्।, चालुक्य साम्राज्य 600 वर्ष होते. मौर्यांनी अफगाणिस्तानपासून ते श्रीलंकेपर्यंत 550 वर्ष राज्य केले. सातवाहनने देखील 500 वर्ष तर गुप्त राजवटीने 400 वर्ष राज्य केले. परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी फक्त मुघल राजवटीचीच चर्चा केली, असे म्हणत अमित शहा यांनी इतिहासाच्या पुनर्लेखनाबाबत सूचक विधान केले.
#WATCH Delhi: Those who wrote history only discussed Mughal empires. Kingdoms like that of Pandyas, Ahoms, Pallavas, Mauryas & Guptas ruled for over 500 yrs & fought valorously but reference texts were not written on them: Union Home Min Amit Shah at a book launch, earlier today pic.twitter.com/fW0WFORfrD
— ANI (@ANI) June 10, 2022



























































