
>> आसावरी जोशी
उद्याचा आपला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा 23 तारखेपासूनच सुरु झाला आहे. यंदाचा हा महत्वाचा दिवस लोकशाहीचा हा उत्सव 26 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे..
देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन येत्या 26 जानेवारी रोजी दिमाखात साजरा केला जाईल. मात्र प्रजासत्ताक सोहळा 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीने सुरू झालेला आहे आणि तो महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपर्यंत (30 जानेवारी) चालेल, असे संरक्षण सचिवांनी सांगितले.
74 वा प्रजासत्ताक दिन सोहळा सुधारित सेंट्रल व्हिस्टा मार्गावर होणार आहे. सरकारने जनतेसाठी 32 हजार तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवली आहेत. प्रथमच, औपचारिक कार्यक्रमांसाठी सर्व अधिकृत आमंत्रणे ऑनलाइन पाठविली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी हे यावर्षी प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे आहेत आणि 120 सदस्यीय इजिप्शियन तुकडी देखील कर्तव्या मार्गावरील उत्सवादरम्यान संचलन करताना पाहायला मिळणार आहे. हिंदुस्थान आपला 74 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे.या सोहळ्यात 19 देशांतील 32 अधिकारी आणि 166 कॅडेट्स सहभागी होण्याची अपेक्षा केली जात आहे. प्रजासत्ताक दिनात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढावा यादृष्टीने आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, कर्तव्यपथाचे देखभाल करणारे कामगार, भाजी विक्रेते, दूध बुथ कामगार, किराणा दुकानदार आणि रिक्षाचालक हे “विशेष निमंत्रित” असतील, अधिकाऱ्यांनी सादरीकरणादरम्यान याची माहिती दिली. “कोविडच्या आधी, एक लाखाहून अधिक लोक प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावत असत, यावर्षी सुमारे 42,000 लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. आणि कार्यक्रमाच्या जागांसाठी 32 हजार तिकिटे ऑनलाइन खुली करण्यात आली आहेत आणि याला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे,” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या वर्षी राजपथचे नामकरण ‘कर्तव्य पथ’ करण्यात आल्यानंतर हा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा असेल. ‘जनभागीदारी’ कल्पनेला समोर ठेवून पर्यटन मंत्रालयाकडून 26 ते 31 जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यासमोरील ज्ञानपथावर ‘हिंदुस्थान पर्व’ आयोजित केले जाईल. यात प्रजासत्ताक दिनाची झलक, लष्करी बँडचे सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, संपूर्ण देशातील फूड कोर्ट आणि हस्तकला बाजार दाखविण्यात येणार आहे.

कर्तव्यपथावर ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पन्नास विमाने सहभागी होतील ज्यात नऊ राफेल आणि नौदलाच्या आयएल-३८ चे हवाई प्रदर्शन समाविष्ट असेल जे पहिल्यांदा आणि कदाचित शेवटच्या वेळी या कार्यक्रमात प्रदर्शित केले जाईल, असे हिंदुस्थानी वायुसेनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. IL-38 हे नौदलाचे एक सागरी हेलिकॉप्टर आहे ज्याने जवळपास ४२ वर्षे सेवा दिली आहे, असे ते म्हणाले.
याशिवाय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील २३ चलचित्रं – १७ चलचित्रं ज्यात विविध मंत्रालये आणि विभागांची सहा, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक आणि सामाजिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांचे चित्रण करणार्या चलचित्रांना कर्तव्य मार्गावर औपचारिक मिरवणुकीदरम्यान पाहाता येईल असं, मंत्रालयाने स्पष्ट केलं.
























































