ऋतुराज! एकाच षटकात सलग 7 षटकारांचा विश्वविक्रम, उत्तर प्रदेशविरुद्ध झळकवले द्विशतक

मराठमोळा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत कोणालाही जमला नाही असा विश्वविक्रम केला. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा कर्णधार असलेल्या ऋतुराजने उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत एकाच षटकात सलग सात षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील पहिला फलंदाज ठरला हे विशेष. याचबरोबर ऋतुराजने कारकिर्दीतील हे पहिले द्विशतक ठोकून आपल्या विश्वविक्रमाला द्विशतकाचा मुलामाही दिला.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऋतुराजचे वादळ घोंगावले. त्याने शिवा सिंहच्या 49व्या षटकांत 43 धावांची लयलूट केली. ऋतुराजने शिवा सिंगच्या पहिल्या चार चेंडूवर सलग चार षटकार मारले. त्यानंतर शिवाने पाचवा चेंडू नो बॉल टाकला. त्यावरही ऋतुराजने षटकार ठोकला होता. तसेच पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाल्यावर ऋतुराजने त्यावरही षटकार लगावला. शिवाच्या अखेरचा चेंडूही त्याने मैदानाबाहेर भिरकावून एकाच षटकात सलग सात षटकार ठोकण्याचा नवा विश्वविक्रम केला. ऋतुराजने 159 चेंडूंत 10 चौकार व 16 षटकारांसह आपली नाबाद 220 धावांची खेळी सजवली.

प्रथम श्रेणीमध्ये दुसऱयांदा एका षटकात 43 धावा

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुसऱयांदा एकाच षटकात 43 धावांची लयलूट झालीय. याआधी, 2018-19मध्ये न्यूझीलंडमधील डोमेस्टिक क्रिकेटमध्ये असे घडलेले आहे. त्यावेळी सेंट्रल डिस्ट्रिक्टचा गोलंदाज विलेम लुडिकने एकाच षटकात 43 धावा दिल्या होत्या. त्या षटकात लुडिकने दोन नो बॉल टाकले होते. नॉर्दन डिस्ट्रिक्ट संघातील जो कार्टर व ब्रेट हॅम्पटन यांनी मिळून 6 षटकार मारले होते. या षटकात एक चौकार व एक एकेरी धावही निघाली होती