
सायन्स आणि कॉमर्स शाखेच्या भरघोस निकालामुळे यंदा मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशात मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या शाखांच्या कटऑफमध्ये उच्चांकी वाढ होण्याची शक्यता प्राचार्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी बारावीत शिकत असलेल्या महाविद्यालयातच इनहाऊस कोटय़ाद्वारे पदवीला प्रवेश घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच मेडिकल आणि इंजिनीयरिंग प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यामुळे सायन्स शाखेचे विद्यार्थी पदवी प्रवेशासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय बोर्डांचा बारावीचा निकाल जाहीर झाल्याशिवाय पुढील प्रवेश सुरू करण्यात येणार नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
मुंबईचा बारावीचा निकाल 90.91 टक्के इतका लागला आहे. या निकालात तब्बल 2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 75 टक्केहून अधिक मिळवलेले विद्यार्थी 36 हजार 862 विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी मूल्यांकनाच्या निकालामुळे या विद्यार्थ्यांची 1 लाख 34 हजार 675 होती. यंदा गुणवंत विद्यार्थी कमी असले तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशासाठी मोठय़ा स्पर्धेतून जावे लागणार आहे. यंदा सायन्स शाखेत मुंबई विभागात 93 हजार 616 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर कॉमर्स शाखेत यंदा 1 लाख 55 हजार 911 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळेल.
सीईटी न झाल्याने पदवी प्रवेशावर परिणाम
सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये असल्याने याचा परिणाम एफवाय प्रवेशावर होणार आहे. अनेक विद्यार्थी सीईटीवर भवितव्य निश्चित नसल्याने विज्ञान किंवा अन्य शाखांकडे वळू शकतात. त्यामुळे पहिली यादी ही टक्केवारीत वाढ करणारी असेल. पारंपरिकबरोबर सेल्फ फायनान्स आणि व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशात चांगलीच चढाओढ होईल. विज्ञान शाखेतील विद्यार्थी आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, एमसीए, फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. यामुळे हे प्रवेश अगोदर होणे अपेक्षित होते. यामुळे पदवी प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो. यंदा सीईटीची नोंदणी झाली आहे, मात्र अद्याप सीईटी आणि त्यानंतरचे प्रवेश झालेले नाहीत. याचाही परिणाम पदवी प्रवेशावर होण्याची शक्यता आहे.



























































