सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावरील स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी अफाट अफाट गर्दी लोटली. सारे रस्तेच शिवतीर्थाकडे निघाले. साश्रुपूर्ण नयनांनी स्मृतिस्थळावर माथा टेकून शिवसैनिकांनी आपल्या दैवताला आदरांजली वाहिली.
शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शिवसैनिकांची रीघ लागली होती. मिळेल त्या वाहनाने मुंबईत दाखल झालेले हे शिवसैनिक तितक्याच शिस्तीने रांगेत उभे राहून स्मृतिस्थळावर नतमस्तक होत होते.
बालपणापासून शिवसेनाप्रमुख माझे प्रेरणास्थान – पीयूष गोयल
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लहानपणापासून आपले प्रेरणास्थान आहेत. वडिलांसोबत ‘मातोश्री’ निवासस्थानी आपण जात होतो त्यावेळी त्यांच्याकडे पाहून एक अनोखी ऊर्जा आम्हाला मिळत होती. हिंदुस्थान, महाराष्ट्र आणि मुंबईप्रति त्यांना प्रचंड आस्था होती. हिंदुस्थान समृद्ध व्हावा, तरुणांचे भवितव्य घडावे यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केल्यावर व्यक्त केली.
250 रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त आज विभाग क्र. 10च्या वतीने विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतीर्थावर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 250 हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. जे. जे. रुग्णालय, जे. जे. महानगर रुग्णालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव आणि वाडिया रुग्णालयाच्या पथकांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.
शिवसेनाप्रमुखांचे वाळूशिल्प आणि ‘चलो अयोध्या’चा संदेश
स्मृतिस्थळाजवळच शिवसेनाप्रमुखांचे वाळूशिल्प सांताक्रुझ येथील लक्ष्मी गौड या महिलेने साकारले. या शिल्पासोबतच शिवसेनाप्रमुखांच्या शेजारीच प्रभू रामचंद्र आणि श्रीराम लिहिलेल्या विटा साकारून लक्ष्मी यांनी ‘चलो अयोध्या’चा नारा दिला. आपण प्रत्यक्ष अयोध्येला जाऊ शकत नसलो तरी अयोध्येत राममंदिर साकारण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांसाठी आपल्याकडूनही हा खारीचा प्रयत्न असल्याचे लक्ष्मी म्हणाल्या.




























































