फुटीरतावाद्यांची मुले परदेशात स्थायिक, माथी भडकवणाऱ्या नेत्यांचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hurriyat-leaders

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू आणि कश्मीरमधील तरुणांची माथी भडकविणाऱ्या 112 फुटीरतावादी नेत्यांच्या 210 मुलांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले असून शिक्षणानंतर ही मुले तेथेच स्थायिक झाल्याचे उघडकीस आले आहे. कश्मीरातील तरुण मुलांना भडकवणाऱ्या या फुटीरतावादी नेत्यांचा संसदेत पर्दाफाश करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने एक यादी प्रसिद्ध करून त्यात 112 फुटीरतावाद्यांची मुले परदेशात काय करतात याची माहिती दिली आहे. कश्मीरात तरुणांना भडकावणे, सुरक्षा दलांविरोधात हिंसा घडविणे आणि वारंवार बंद पुकारणे आदी कारवायांमध्ये हे फुटीरतावादी नेते असतात. या आंदोलनांमध्ये अनेक तरुण जीव गमावतात, मात्र या नेत्यांची मुले परदेशात व्यवस्थित स्थिर झाली आहेत. यात आसिया अंद्राबी हिच्यापासून मीरवाइज उमर फारुक आदी नेत्यांच्या मुलांचा समावेश आहे.

फुटीरतावादी नेते आणि त्यांच्या संघटना

निसार हुसैन रादर (वाहिदत ए इस्लामी)- मुलगा आणि मुलगी इराणमध्ये स्थायिक असून मुलगी इराणमध्येच नोकरी करते.

बिलाल लोन (पी.सी.)- लोन याची सर्वांत लहान मुलगी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे. एक मुलगी आणि जावई लंडनमध्ये स्थायिक आहेत.

अशरफ सेहराई (चेअरमन, तहरीक-ए-हुरियत)- खालिद आणि आबिद अशरफ ही दोन्ही मुले सौदी अरेबियामध्ये काम करीत आहेत.

जी. एम. भट्ट (आमिर-ए-जमात)- यांचा मुलगा सौदी अरेबियामध्ये डॉक्टर आहे.

आसिया अंद्राबी (दुख्तरान-ए-मिल्लत)- हिचा एक मुलगा मलेशियात तर दुसरा मुलगा ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे.

मोहम्मद शफी रेशी (डी.पी. एम.) याचा मुलगा अमेरिकेत पीएच.डी. करीत आहे.

अशरफ लाया (तहरीक-ए-हुरियत) याची मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

जहूर गिलानी (तहरीक-ए-हुरियत) याचा मुलगा सौदी अरेबियामध्ये एअरलाइन्समध्ये काम करीत आहे.

मीरवाइज उमर फारुक (हुरियत चेअरमन)- याची बहीण राबीया फारुक डॉक्टर असून अमेरिकेत स्थायिक आहे.

मोहम्मद युसूफ मीर (मुस्लिम लीग) याची मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.