अबब! सहा अपत्ये असूनही पती-पत्नी शासकीय सेवेत, बडतर्फ करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मुलांच्या आधारकार्डचे फोटो

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी येथील युसूफ कॉलनीतील वादग्रस्त कामेल एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा कामेल उर्दु हायस्कूलचे लिपीक मोहमद मुश्ताक अहेमद व त्यांची पत्नी कामेल उर्दु हायस्कूलच्या मुख्याध्यापीका शेख शहाणा बेगम यांना 28 मार्च 2005 पूर्वी तीन अपत्य असतानाही 23 जुलै 2005 ला चौथ्या आपत्यास जन्म दिला. त्यानंतरही 2010 पर्यंत एकूण 6 अपत्य या दाम्पत्यांनी जन्मास घातले. शासनाच्या मर्यादित कुटुंब संदर्भातील शासन निर्णय 28 मार्च 2005 ला जारी करण्यात आलेल्या अधिकृत परिपत्रकाचा या दाम्पत्यांनी भंग केला असून त्या दोघांनाही शासनाच्या नौकरीतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनेचे नेते स.र. कादरी यांनी महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवाकडे केली आहे.

कामेल एज्युकेशन सोसायटी संचलित कामेल उर्दु हायस्कूल या शाळेत शेख शहाणा बेगम या मुख्याध्यापीका आहेत. तर त्यांचे पती मोहमद मुश्ताक अहेमद हे सदर संस्थेचे असून याच शाळेत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. लिपीक पदावर असले तरी ते लिपीकाचे कोणतेही न करता संस्था अनुदानावर आल्यापासून फुकट पगार उचलून शासनाची फसवणूक करतात. या दाम्पत्याला 3 सप्टेंबर 1996 रोजी पहिला कन्यारत्न जन्माला आले. त्यानंतर 3 मे 1998 रोजी दुसरे कन्यारत्न आणि 8 एप्रिल 2003 रोजी तिसरे अपत्य जन्माला आले. महाराष्ट्र शासनाने 28 मार्च 2005 रोजी लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनातील कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी (जा.क्र. एस.आर.व्ही. 2000 प्र.क. 17/2000 सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई) नवा आदेश जारी केलेला आहे. यानुसार 28 मार्च 2005 नंतर शासन सेवेतील कर्मचाऱ्यास तिसरे अपत्य आढळून आल्यास त्यांना शासकीय नौकरीतून बडतर्फ करण्यात यावे, असे स्पष्ट आदेश बजावण्यात आले आहेत. परंतु या शासन आदेशाला लिपीक मोहमद मुश्ताक अहेमद व त्यांची पत्नी मुख्याध्यापीका शेख शहाणा बेगम यांनी केराची टोपली दाखविली.

2005 पूर्वी 3 अपत्य असतानाही त्यांनी त्यानंतर 29 मे 2010 पर्यंत आणखी 3 अपत्य जन्मास घातली. या सर्व सहाही अपत्यांची आधारकार्ड, जन्म दाखला उपलब्ध आहेत. त्यांचे चौथे आपत्य 23 जुलै 2005, पाचवे अपत्य 27 मे 2008 आणि सहावे अपत्य 29 मे 2010 रोजी जन्मले. 28 मार्च 2005च्या कायद्यानंतर वरील 3 अपत्य असून त्यांचे शाळेतील दाखले सुद्धा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे शासनाच्या अपत्य कायद्याचा भंग केल्यानंतर त्यांनी आणखी एक अत्यंत गंभीर चूक केली आहे. मुख्याध्यापीका शहाणा बेगम यांनी आपल्या दोन अपत्याच्या जन्मावेळी एक दिवसाचीही प्रासंगीक रजा घेतलेली नाही. कोणतीही प्रसुती रजा न घेता, प्रसुती काळात स्वत: मुख्याध्यापीका म्हणून स्वत:चा पूर्ण पगार त्यांनी काढून घेतला. शासनाची एक प्रकारे त्यांनी फसवणूक केली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन या दाम्पत्याला बडतर्फ करण्यात यावे आणि शासनाने त्यांनी उचललेला नियमबाह्य पगार दंड-व्याजासह वसुल करावा, फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षक संघटनेचे नेते स.र. कादरी यांनी संपूर्ण पुराव्यासह प्रधानसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या सहाही अपत्यांचे जन्मदाखले, आधारकार्ड या तक्रारीसोबत जोडले आहेत.

मोहमद मुश्ताक अहेमद यांची लिपीक पदावर नेमणूक 19 जून 2000 रोजी झाली असून त्यांची पत्नी कामेल उर्दू हायस्कूलची मुख्याध्यापीका शेख शहाणा बेगम यांची नेमणूक 23 सप्टेंबर 2005 रोजी झाली आहे. सदरील कामेल उर्दु हायस्कूल ही शाळा 2006 मध्ये 40 टक्के अनुदानावर आली. त्यानंतर 2007 मध्ये 60 टक्के आणि 2009 मध्ये 100 टक्के अनुदानावर आली. घरचीच संस्था असल्याने हा सहा अपत्यांचा आणि नियमबाह्य पगार उचलण्याचा गैरप्रकार झाला आहे.