
सामना प्रतिनिधी । मालवण
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाइपने वार केल्याचा प्रकार पराड- मालवण येथे घडला आहे. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ४ नोव्हेंबरला पराड येथे घडली. याबाबत मुलगा सिद्धेश शिंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अशोक राजाराम शिंगरे वय- ५५ याच्यावर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराड येथे अशोक शिंगरे पत्नी सीमाली शिंगरे हिच्यासह राहतात. त्याचा मुलगा शिक्षणासाठी गोवा येथे तर दोन मुली नोकरीनिमित्त मुंबईत आहेत. सीमाली या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी गेले दोन महिने कुडाळ येथे कामास जात होत्या. यात नवरा अशोक हा तिच्यावर संशय घेत नेहमी शिवीगाळ करत असे. यात ४ नोव्हेंबरला रात्री जेवण आटोपून त्या झोपण्यासाठी अंथरुणावर पडल्या असता सीमाली यांच्या डोक्यावर, तोंडावर अशोक याने लोखंडी पाईपने वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर तो तेथून पळून गेला. ही घटना समजताच शेजारच्या ग्रामस्थांनी तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्यात आले. या घटनेची माहिती तिच्या मुलास दिली. त्यानुसार सिद्धेश याने वडील अशोक याच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.




























































