
पती-पत्नींमध्ये कोणत्या कारणांवरुन भांडणे होतील, याचा काय नेम नाही. औंध गावात अशीच एक घटना घडली आहे. पतीने मटण आणून बायकोला बनविण्यास दिले. हातात दुसरे काम असल्याने मटण दीड तासानंतर बनवून देते, असे पत्नीने त्याला सांगितले. मटन बनवण्यासाठी एवढा वेळ का लागणार असे त्याने विचारले.
मटन बनवण्यास उशील लागेल असे बायकोने सांगितल्याचा राग आल्यामुळे पतीने पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात जोरात तिच्या तोंडावर ठोसा मारुन तिचे दात पाडले आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रभाकरन् नाडार (वय 45) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता नाडार (वय 40) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता आणि प्रभाकरन् पती-पत्नी असून औंध गावात राहातात. दोन दिवसांपूर्वी प्रभाकरन दारु पिऊन घरी मटण घेऊन आला होता. त्याने कविताला मटण बनवून देण्यास सांगितले. मात्र, हातात काम असल्याने दीड तासानंतर मटण बनवून देते असे तिने प्रभाकरनला सांगितले. त्याचा राग आल्यामुळे त्याने कविताला शिवीगाळ करत तिच्या तोंडावर ठोसा मारला. त्यामुळे कविताचे दात पडून दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.































































