प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा खून करणाऱया पतीला जन्मठेपेची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी जंगलात नेऊन गर्भवती पत्नीचा खून केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी पतीला जन्मठेपेची शिक्षा व 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. महेश भारत मिसाळ (वय 24, रा. खामसवाडी, ता. कळंब) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मनीषा महेश मिसाळ (वय 24) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

महेश मिसाळ याचे मनीषासोबत घटनेच्या एक वर्ष आधी लग्न झाले होते. महेश हा पुण्यात नोकरीला असून, त्याचे नात्यातीलच एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पत्नी मनीषाचा अडथळा होत होता. त्यामुळे त्याने पत्नीचा काटा काढण्यासाठी कट रचला. पतीच्या या प्रेमसंबंधाविषयीची माहिती मनीषाने आपल्या कुटुंबीयांना दिली होती. घटनेच्या दिवशी अचानक सकाळी साडेदहा वाजता महेश मनीषासह सासरवाडीला आला. तिथे न थांबता तो मनीषाला घेऊन बार्शी तालुक्यातील पाथरी येथे बहिणीकडे गेला. त्यानंतर संध्याकाळी सासरे दादाराव फुगारे यांना परतत असल्याचे सांगितले; परंतु रात्री उशिरापर्यंत न परतल्याने शोधाशोध करण्यात आली.

दरम्यान, महेश याने परतत असताना आडवाटेने येडेश्वरी येथील घनदाट जंगलात नेऊन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला व स्वतः अंगावर चाकूने जखमा करून घेऊन धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. पोलिसांना त्याने चोरांनी मारहाण केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने कसून तपास केल्यानंतर त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.

याबाबत पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. यात चार साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता. न्यायलयाने परिस्थितीजन्य पुरावा पाहून आरोपी महेश मिसाळ याला जन्मठेपेची शिक्षा व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे ऍड. शांतवीर महिद्रकर तर आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.