हैदराबादमधील ‘निर्भया’ला दहा दिवसांतच न्याय, त्या चार नराधमांचा त्याच ठिकाणी खात्मा!

483

हैदराबाद येथील व्हेटरनरी डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कारानंतर तिची निर्घृण हत्या करून जिवंत जाळणाऱया चार नराधम आरोपींचा पोलीस एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला. ज्या ठिकाणी पीडितेला जाळण्यात आले होते त्याच ठिकाणी शुक्रवारी पहाटे 5.45 ते 6.15 च्या दरम्यान पोलीस चकमकीत चार नराधमांना यमसदनी धाडण्यात आले. पीडित तरुणीला अवघ्या दहा दिवसांत न्याय मिळाल्यामुळे देशभरात समाधान व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी तेलंगणा पोलिसांवर पुष्पवृष्टी केली. नागरिकांनी अनेक ठिकाणी पेढे वाटले, फटाके फोडले. दरम्यान, काही जणांनी एन्काऊंटरविषयी प्रश्न उपस्थित करीत मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा पुढे केला आहे.

hyderabad-encounter-site

मानवतेला काळिमा फासणाऱया हैदराबाद येथील अमानुष क्रौर्याच्या घटनेने अवघा देश सुन्न झाला होता. 27 नोव्हेंबर रोजी ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर असलेल्या चार आरोपींनी कट रचून हा भयंकर गुन्हा केला. व्हेटरनरी डॉक्टर असलेली 27 वर्षीय तरुणी रोज शमशाबाद येथील टोलनाका येथे आपली स्कुटी पार्क करून कॅबने सरकारी रुग्णालयात जात असे. चार नराधमांनी स्कुटी पंक्चर केली. पंक्चर काढण्याच्या बहाण्याने तरुणीचे अपहरण केले. दारू पिऊन तिच्यावर बलात्कार केला व नंतर गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर ट्रकमध्ये मृतदेह टाकून 30 किलोमीटरवर चट्टनपल्ली येथे हैदराबाद-बंगळुरू महामार्गाखालील अंडरपार्क येथे पेट्रोल टाकून जाळला. या भयंकर घटनेने देशभरात नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. तेलंगणा पोलिसांवर लोकांनी चपला फेकल्या. पोलीस ठाण्याला घेराव घातला. अनेक ठिकाणी आंदोलने झाली. 48 तासांच्या आत पोलिसांनी मोहम्मद आरिफ, शिवा, नवीन, केशवुलू या चौघांना अटक केली.

sajjanar-police-commissione

देवानेच न्याय दिला-कायदामंत्री रेड्डी
देशभरातील अनेक मान्यवरांनी या चकमकीचे समर्थन केले आहे. तेलंगणाचे कायदामंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी हा देवानेच दिलेला न्याय आहे असे म्हटले आहे.

hyderabad-encounter-thank-y

‘ती’ 30 मिनिटे
तेलंगणाची राजधानी हैदराबाद पोलीस दलात तीन आयुक्तालये आहेत. या प्रकरणाचा तपास सायबराबाद पोलिसांकडे आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी चकमक कशी झडली याची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली.

सायबराबादचे पोलीस अधिकारी आणि दहा पोलिसांचे पथक आज पहाटे चार आरोपींना घेऊन हैदराबाद-बंगळुरू महामार्गाखालील अंडरपार्क येथे घटनास्थळी गेले. आरोपींनी नेमका गुन्हा कसा केला हे जाणून घेण्यासाठी ‘सीन रिक्रीयेशन’करिता आरोपींना नेले होते. घटनास्थळी पोहचल्यानंतर आरोपी मोहम्मद आरिफ आणि केशवुलू या दोघांनी पोलिसांजवळील बंदुका हिसकावून घेतल्या आणि पोलिसांवर गोळीबार सुरू केला.

hyderabad-encounter-blur-im

दोन आरोपी गोळीबार करत होते तर दोघे दगड मारीत होते. पहाटे 5.45 ते 6.15 अशी अर्धा तास ही चकमक सुरू होती. आरोपी पळून जात होते. पोलिसांनी अनेकदा वॉर्निंग दिली. गोळीबार न करता शरण येण्यास सांगितले तरी आरोपींचा गोळीबार सुरूच होता. अखेर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला. यात चारही आरोपी ठार झाले.
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. या एन्काऊंंटरप्रकरणी कोणत्याही चौकशीला सायबराबाद पोलीस तयार असल्याचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले.

धाडसी पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार
1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार हे धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जातात. आजच्या एन्काऊंटरनंतर 2008 च्या वारंगल चकमकीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 2008 ला अखंड आंध्र प्रदेशात वारंगल येथे इंजिनीअरिंगच्या दोन विद्यार्थिनींवर ऑसिडहल्ला झाला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. आंध्र प्रदेशात आंदोलने, मोर्चे निघाले होते तेव्हा वारंगलचे पोलीस अधीक्षक सज्जनार होते. तीन आरोपींचे एन्काऊंटर झाले. आज सज्जनार सायबराबादचे पोलीस आयुक्त आहेत. यापूर्वी त्यांनी सात वर्षे पोलीस इंटेलिजन्समध्ये काम केले आहे. तेलंगणा राज्य निर्मितीनंतर माओवादी-नक्षलवाद्यांचा हिंसाचार त्यांनी मोडून काढला होता.
‘निर्भया’चे आईवडील म्हणाले तेलंगणा पोलिसांनी योग्यच केले!

दिल्लीतील ‘निर्भया’कांडाला सात वर्षे झाली तरी नराधम आरोपींना फासावर लटकविले नाही. ‘निर्भया’ला न्याय कधी मिळणार, असा सवाल करीत निर्भयाच्या आईवडिलांनी तेलंगणा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. आरोपींना असेच ठार मारले पाहिजे. पीडित तरुणीला, तिच्या कुटुंबीयांना तेलंगणा पोलिसांनी तत्काळ न्याय दिला आहे. या पोलिसांवर कोणतीही कारवाई करू नये. तेलंगणा पोलिसांचे काम कौतुकास्पद आहे.

महामार्गावर प्रचंड गर्दी; पोलिसांवर पुष्पवृष्टी
चार नराधम आरोपींचा खात्मा झाल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरले. सकाळीच वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली आणि हैदराबाद आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. पुलाखाली पोलिसांचा ताफा होता. पुलावरून नागरिकांनी पोलिसांवर पुष्पवृष्टी केली. तेलंगणा पोलीस झिंदाबादचे नारे दिले. पोलीस आयुक्त सज्जनार यांच्या नावाने घोषणा दिल्या. तेलंगणात अनेक ठिकाणी फटाके फोडले. पेढे वाटण्यात आले. बलात्कार करणाऱया आरोपींना असेच मारले पाहिजे. तत्काळ शिक्षा करायला हवी अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.

hyderabad-encounter-mithai

माझ्या लेकीला न्याय मिळाला- पीडितेचे वडील
सकाळी टी.व्ही.वर एन्काऊंटरची बातमी पाहिली आणि समाधान झाले. आरोपींना ठार केल्यामुळे जनतेलाही आनंद झाला आहे. तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे आम्ही आभारी आहोत. माझ्या लेकीला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया पीडित तरुणीच्या वडिलांनी दिली. आरोपींना अशीच शिक्षा दिली पाहिजे. दोषींना तत्काळ शिक्षा दिली तर यापुढे असे गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही अशी प्रतिक्रिया पीडितेच्या बहिणीने दिली.

priyanka-reddy-father

‘पोस्को’तील गुन्हेगारांना दयामाया दाखवूच नये!
देशात सामूहिक बलात्काराचे गुन्हे वाढल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींना दयेचा अर्ज करण्याची तरतूदच नको असे वक्तव्य केले.

1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार हे धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जातात.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची प्रतिमा असून जनसामान्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर ‘रिअल लाइफ सिंघम’ असा ट्रेंड सुरू केला आहे. सज्जनार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या