
सामना ऑनलाईन। हैदराबाद
भाजप कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी काहीच प्रयत्न करणार नाही, पण या वर्षाच्या अखेरपर्यंत हे आघाडी सरकार नक्की कोसळणार, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकातील भाजप सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांनी सोमवारी केला. भाजप बऱयाच महिन्यांपासून हे आघाडी सरकार टिकणार नाही असे म्हणत आहे.
यंदा लोकसभेच्या निवडणुकीत कर्नाटकातील 28 जागांपैकी 25 जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर काँग्रेस व जेडीएसला एकेक जागा मिळाली आहे. उर्वरित एक जागा भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुमालता यांनी जिंकली आहे. दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 104 जागा पटकावल्या होत्या, पण राज्यात त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. कारण सध्याच्या आघाडी सरकारने 117 आमदारांचे संख्याबळ दाखवले होते. यात काँग्रेसचे 78 आणि जेडीएसचे 37 आमदार होते. याबाबत बोलताना राव म्हणाले की, सध्या काँग्रेस आणि जेडीएस यांचे आघाडी सरकार सत्तेत असले तरी लोकांचे समर्थन त्यांना नाही. त्यामुळे सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपला कोणतेही प्रयत्न करावे लागणार नाहीत.





























































