ICC Test Ranking आयसीसीचा माफीनामा, ‘नंबर वन’चा घोळ कसा झाला याचंही स्पष्टीकरण दिलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी क्रमवारीमध्ये मोठा घोळ झाला होता. बुधवारी जाहीर झालेल्या ‘आयसीसी’च्या ताज्या कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानी संघाला ‘नंबर वन’च्या सिंहासनावर बसवलं अन् चूक लक्षात येताच सहा तासांत पुन्हा खाली उतरवले. कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानला अव्वल स्थान दिल्यानंतर हा संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ‘नंबर वन’ झाल्याने क्रिकेटविश्वात ही मेन न्यूज झाली होती. मात्र अवघ्या काही तासातच आयसीसीने चूक सुधारली आणि आता याबाबत माफीही मागतली असून ही चूक नक्की कशी झाली याचेही स्पष्टीकरण दिले आहे.

गुरुवारी आयसीसीने आपली चूक स्वीकारत एक निवेदन प्रसिद्ध केले. ’15 फेब्रुवारी 2023 रोजी काही काळासाठी तांत्रिक चुकीमुळे हिंदुस्थानचा संघ आयसीसीच्या वेबसाईटवर कसोटीमध्ये नंबर वन दाखव होता. याबाबत आम्ही माफी मागतो. ऑस्ट्रेलियाचा संघ झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजमधील दोन सामन्यांच्या मालिकेनंतरही ताज्या क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे’, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

आयसीसीने पुढे नमूद केले की, ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानविरुद्ध 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दिल्ली कसोटीत नंबर वनचा संघ म्हणून मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाचे 126 गुण असून हिंदुस्थानचे 115 गुण आहेत. हिंदुस्थानचा संघ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-23च्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी लढेल. ऑस्ट्रेलिया देखील फायनलच्या रेसमध्ये आहे. फायनल 7 ते 11 जून दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे.

टीम इंडियाला महिनाभरात दुसऱ्यांदा गंडविले

गेल्या आठवड्यात हिंदुस्थानने नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियावर एक डाव 132 धावांनी दणदणीत विजय मिळविला होता. या विजयामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थान मिळाले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय व टी-20) ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान झालेल्या टीम इंडियावर चौफेर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आज दुपारी एकच्या सुमारास झालेल्या बदलानंतर टीम इंडिया 115 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचली, तर ऑस्ट्रेलियाची 111 गुणांसह दुसऱया स्थानावर घसरण झाली. मात्र गुणांमध्ये मोठी तफावत असल्याने क्रिकेटतज्ञांना या गुणांकावर संशय आला. त्यानंतर आयसीसीने रात्री चुकीची दुरुस्ती केली. याआधी 18 जानेवारीलाही आयसीसीने हीच चूक करून टीम इंडियाला अव्वल स्थानी पोहोचविले होते.