सलामीला मोठा उलटफेर, श्रीलंकेचा नामिबियाकडून पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या यंदाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सुरुवातच मोठी सनसनाटी झाली आहे. आशिया चषकात बलाढय़ हिंदुस्थान आणि पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद पटकावणाऱया श्रीलंकन क्रिकेट संघाला विश्वचषक पात्रता फेरीच्या सलामीच्या लढतीत 55 धावांनी पराभूत करीत नवख्या नामिबिया संघाने स्पर्धेत मोठा उलटफेर घडवून आणला आहे. आशियातील चॅम्पियन संघ आणि दोन वेळा जगजेता ठरलेल्या श्रीलंकेची टी-20 विश्वचषक 2022 मध्ये लाजिरवाणी सुरुवात झाली आहे. कागदावर अत्यंत कमकुवत दिसणाऱया नामिबियाने त्यांना पराभवाचा धक्का दिला. आयसीसी क्रमवारीत मागे राहिल्याने श्रीलंकेला सुपर-12 मध्ये स्थान मिळाले नाही. श्रीलंकेला ‘अ’ गटातील खूप मजबूत संघ मानला जातो, परंतु पहिल्याच सामन्यात नामिबियाने आपला खेळ दाखवून दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पात्रता सामन्यात नामिबियाने श्रीलंकेसारख्या दिग्गज संघाचा 55 धावांनी पराभव केला. नामिबियाने 164  धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकांतच 108  धावांत गारद झाला. नामिबियाच्या अष्टपैलू खेळाडूंनी या सामन्याचे फासे फिरवले. जॅन फ्रायलिंक आणि जेजे स्मिथ यांनी 69  धावांची भागीदारी केली. दोघांनीही महत्त्वाच्या प्रसंगी श्रीलंकेच्या तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. विशेष म्हणजे कर्णधार गेरहार्ड इरॅस्मस आणि डेव्हिड विसे  वगळता अन्य मोठे  स्टार क्रिकेटर नसणाया नामिबियाने श्रीलंकन संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत धोबीपछाड देत शानदार विजयी सलामी दिली.

फ्रायलिंकची  44  धावांची धडाकेबाज खेळी

जिलॉन्गच्या सिमंड्स स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नामिबियाकडून जेन फ्रायलिंकने 28 चेंडूंत 44 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. संघाची  टॉप ऑर्डर लवकर तंबूत परतल्यावर जॉन निकोल लॉफ्टी-ईटन (20), स्टीफन बायर्ड (26) आणि कर्णधार इरॅस्मस  (20) यांनी संघाची धावसंख्या 150  च्या पुढे नेली. श्रीलंकेच्या प्रमोद मदुशनने दोन फलंदाज बाद केले. सुरुवातीच्या पडझडीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान देत नामिबियाला 20 षटकांत 7 बाद 163 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

 संक्षिप्त धावफलक

नामिबिया: 20 षटकांत 7 बाद 163 (जेन फ्रायलिंक 44, स्टिफन बार्ड 26, जेजे स्मिथ नाबाद 31; प्रमोद मदुषन 37 धावांत 2 विकेट ) विजयी वि. श्रीलंका: 19 षटकांत सर्व बाद 108 (भानुका राजपक्षे 20, दासून शनाका 29; डेव्हिड विसे 16 धावांत 2 विकेट, बर्नार्ड शॉल्ट्झ 18 धावांत 2 विकेट, बेन शिकाsंगो 22 धावांत 2 विकेट, जेन फ्रायलिंक 26 धावांत 2 विकेट).

 श्रीलंकन गळपटले

टीम इंडिया आणि पाकिस्तान या बलाढय़ संघांना आशिया चषकात पराभूत करणाऱया श्रीलंकन संघाचे स्टार फलंदाज आज मात्र नामिबियाच्या नवख्या वेगवान गोलंदाजांपुढे पार निष्प्रभ ठरले. नामिबियाच्या डेव्हिड विसेने 16 धावांत 2, बर्नार्ड शॉल्ट्झने 18 धावांत 2, बेन शिकांगोने 22 धावांत 2 तर जेन फ्रायलिंकने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत 26 धावांत 2 फलंदाज बाद केले. श्रीलंकेच्या वतीने भानुका राजपक्षे 20 आणि कर्णधार दासून शनाका 29 या दोघांनाच धावांची विशी पार करता आली.

धावगती वाढवू न शकल्याने, यूएईची 111 धावांपर्यंतच मजल

तत्पूर्वी यूएईच्या कर्णधाराने  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूएईने संथ पण दमदार सुरुवात केली. सलामीवीर चिराग सुरी 20 चेंडूंत 12 धावा करून वॅन डर मर्वेचा बळी ठरला. 33 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर सलामीवीर मोहम्मद वसीम (41) सोबत काशीफ दाऊद (15) यांनी डाव पुढे नेला. यानंतर वृत्त्य अरविंदनेही 21 चेंडूंत 18 धावांची खेळी केली. या चार फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला, पण सर्वांनी केलेल्या धावांपेक्षा जास्त चेंडू खेळले. याचा परिणाम असा झाला की, संघाचा धावगती सर्वकाळ 6च्यावर जाऊ शकला नाही. इतर फलंदाज काही धावा करून तंबूत परतले. जवर फरीद (2), बासील हमीद (4), पॅप्टन रिझवान (1) आणि अयान अफजल खान (5) विशेष चमक  दाखवू शकले नाहीत. अखेर यूएईचा संपूर्ण संघ निर्धारित 20 षटकांत 8 विकेट  गमावून केवळ 111 धावाच करू शकला. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने 3 आणि फ्रेड क्लासेनने 2 विकेट घेतल्या. टीम प्रिंगल आणि रॉल्फने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक

यूएई: 20 षटकांत 8 बाद 111 (मुहम्मद वासीम 41, काशीफ दाऊद 15, वृत्त्य अरविंद 18; फ्रेड क्लासेन 13 धावांत 2 विकेट, बास डी लीडे 19 धावांत 3 विकेट) पराभूत वि. नेदरलँड्स: 19.5 षटकांत 7 बाद 112
(मॅक्स ओडोवड 23, बार्न डी. लीडे 14, कॉलीन ऍकरमन 17, स्कॉट एड्वर्ड्स 16, टीम प्रिंगले 15; जुनेद सिद्दिकी 24 धावांत 3 विकेट)