
आजपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली. शुभारंभाच्या सामन्यातच मोठा उलटफेर पाहायला मिळाला. नामिबिया आणि श्रीलंका संघात कार्दिनिया पार्कमध्ये पहिला सामना रंगला. या लढतीत नामिबियाने आशियन चॅम्पियन श्रीलंकेचा 55 धावांनी दारुण पराभव करत क्रिकेटमध्ये नवीन अध्याय लिहिला.
नामिबियाने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेपुढे विजयासाठी 164 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 108 धावांमध्ये गारद झाला. श्रीलंकेच्या फक्त 4 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला, इतर सात फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. दसुन शनाका याने सर्वाधिक 29 धावा केल्या. नामिबियाकडून डेव्हिड व्हिस, बर्नार्ड स्कोझ, बेन शिलोंगो आणि जान फ्रिलिंक यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर जेजे स्मिटला एक बळी मिळाला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्या तीन षटकामध्ये दोन्ही सलामीवीर बाद केले. मात्र त्यानंतर आलेल्या प्रत्येक फलंदाजाने धावा काढत श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या मर्यादा उघड केल्या. 20 षटकांमध्ये नामिबियाने 7 बाद 163 धावा केल्या. जान फ्रिलिंक याने सर्वाधिक 44 धावांचे योगदान दिले, जेजे स्मिटने 16 चेंडूत 31 धावा चोपल्या.
नेदरलँडचा रोमहर्षक विजय
आज खेळलेल्या गेलेल्या दुसऱ्या लढतीत नेदरलँडने यूएईचा रोमहर्षक लढतीत 3 गडी राखून पराभव केला. यूएईने नेदरलँडसमोर विजयासाठी 112 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडची दमछाक झाली. विसाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर नेदरलँडने विजय मिळवला.
An incredible opening day of the #T20WorldCup comes to an end 🔥
Netherlands cross the finish line in yet another thrilling contest!#UAEvNED |📝 https://t.co/sD75sGYNF1 pic.twitter.com/Kh8yIBhSeJ
— ICC (@ICC) October 16, 2022


























































