सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याने सिंग संतप्त झाले असून त्यांनी ‘कोण गुड, कोण बॅड कॉप याचा रिबेरोंनी तत्काळ खुलासा करावा व माझी जाहीर माफी मागावी. तसे न केल्यास या बेजबाबदार निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल,’ असा इशाराही परमबीर सिंग यांनी दिला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पोलीस महासंचालक म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांच्या जागी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या सुबोध कुमार जायसवाल यांची ३० जून रोजी नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या स्पर्धेत संजय बर्वे व परमबीर सिंग हे दोन अधिकारी होते. या दोघांच्याच नावाची सर्वत्र चर्चा होती; परंतु सुबोध कुमार जायसवाल यांना दिल्लीहून पाचारण करून या दोन अधिकाऱ्यांच्या चर्चेला विराम देण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले आणि सर्वच आयपीएस अधिकाऱ्यांना धक्का दिला.
आपल्या मर्जीतील व आवडीचा अधिकारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बसल्यानंतर मुंबई पोलीस दलात कायम हस्तक्षेप करणाऱया व पोलिसांना अकारण सल्ले देणाऱया रिबेरो यांनी आघाडीच्या एका इंग्रजी दैनिकात “CM brings good cops in keeps bad cops out’’ या मथळय़ाखाली लेख लिहून मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या स्पर्धेतील प्रमुख उमेदवार परमबीर सिंग यांची ‘बॅड कॉप’ अशी संभावना केली. त्यामुळे ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे संतप्त झाले असून त्यांनी आपली कामगिरी उत्कृष्ट असताना, आपल्या गोपनीय अहवालात वरिष्ठांनी outstanding officer असा शेरा लिहून आपल्या कामाचे कौतुक केले होते, ठाण्यात मी अप्रतिम कामगिरी केली आहे, असे असताना मला bad cops म्हणणारे हे रिबेरो कोण? माझा अपमान आणि बदनामी करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला, मी वाईट असल्याचे त्यांच्याकडे काय पुरावे आहेत? असा सवाल करून त्यांनी आपल्या लेखाचा खुलासा करावा, माफी मागावी नाहीतर मला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशी एक नोटीस रिबेरो यांना पाठविली आहे. त्यामुळे साऱ्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
रिबेरो यांचा ‘कॉपीराईट’चा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांचा सतत पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध येत असतो. पोलिसांची त्यांना मदत घ्यावी लागते. ते हस्तक्षेप करीत असतात. त्यामुळे कुणाला बॅड, कुणाला गुड कधी म्हणायचे, प्रशस्तिपत्र द्यायचे त्यांना चांगले माहीत आहे. माझ्या कामातही रिबेरो यांनी बऱ्याचदा हस्तक्षेप केला होता. गैरकामे सांगितली होती. तेव्हा मी बॅड नव्हतो, असेही परमबीर यांनी आपल्या नोटिसीत नमूद करून रिबेरो यांच्या लेखावरून त्यांच्यावर आसुड ओढले आहेत. आता रिबेरो नेमकी काय भूमिका घेतात यावर साऱ्या पोलीस दलाचे लक्ष लागून राहिले आहे.




























































