पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांची कोटींची उड्डाणे, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्यांचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवई येथील आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांची कोटींची उड्डाणे आजपासून सुरू झाली. आयआयटीतील पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा जास्त वेतनाच्या ऑफर्स पहिल्याच दिवसापासून मिळाल्या. आयटी क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट या कंपनीने सर्वाधिक 1 कोटी 16 लाख रुपयांची ऑफर दिली. त्यापाठोपाठ उबेर आणि ऑप्टिव्हर या कंपन्यांकडून करोडोंच्या ऑफर्स मिळाल्या.

देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये आजपासून कॅम्पस प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरू झाला. आयआयटी मुंबईत आज पहिल्याच दिवशी 18 नामांकित कंपन्या प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. आयआयटी मुंबई ही देशात आणि जगामध्येही एक प्रतिष्ठत आयआयटी संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना या कंपन्यांकडून चांगल्या ऑफर्स मिळाल्या. आयआयटी मुंबईतील या कॅम्पस प्लेसमेंटसाठी 1700 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आज पहिल्या दिवशी 110 विद्यार्थ्यांच्या मुलाखती आणि निवड झाली.

मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रूमेंटस्, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि गोल्डमन सॅच्स या कंपन्यांनी देशातील त्यांच्या विविध शाखांमध्ये मोठय़ा प्रमाणात ऑफर्स आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना दिल्या. मायक्रोसॉफ्ट, ऑप्टिव्हर आणि उबेरकडून परदेशातील नोकऱयांच्या ऑफर्स मिळाल्या. कोअर इंजिनीयरिंग, आयटी/सॉफ्टवेअर, फायनान्स ऍण्ड कन्सल्टिंग या क्षेत्रातील कंपन्यांकडून जास्तीत जास्त ऑफर्स मिळत आहेत अशी माहिती आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली.

देशांतर्गत ऑफर्स
क्वालकॉम – वार्षिक वेतन 32.59 लाख रुपये
गुगल – वार्षिक वेतन 32 लाख रुपये
गोल्डमन सॅच्स – वार्षिक वेतन 31.50 लाख रुपये

परदेशांतील ऑफर्स
मायक्रोसॉफ्ट – वार्षिक 1.64 लाख डॉलर्स (सुमारे 1 कोटी 16 लाख रुपये)
ऑप्टिव्हर – वार्षिक 1.30 लाख युरो (सुमारे 1 कोटी 3 लाख रुपये)
उबेर – वार्षिक 1.43 लाख डॉलर्स (सुमारे 1 कोटी दीड लाख रुपये)