
सामना प्रतिनिधी । मुंबई
ऍप्रेंटिस गुण ऑनलाइन अपलोड करण्यास झालेल्या दिरंगाईमुळे राज्यातील आयटीआयच्या 450 ते 500 विद्यार्थ्यांना 29 मे रोजी झालेली आयटीआयची लेखी परीक्षा देता आली नाही. वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर असलेल्या या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळणार असून केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने 26 जूनपासून नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने 7 जूनपासून उपलब्ध होणार आहे.
दादर आयटीआयमध्ये शिकणारे 23 विद्यार्थी मागील एक वर्षापासून एसटी महामंडळ वर्कशॉप, विद्याविहार येथे ऍप्रेंटिस करीत आहेत. या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 29 मे रोजी तर प्रॅक्टिकल परीक्षा 7 जूनपासून सुरू होणार होती. पण या विद्यार्थ्यांच्या ऍप्रेंटिसच्या गुणांची ऑनलाइन नोंद न झाल्याने परीक्षा तोंडावर आली तरी हॉल तिकीटच मिळाले नाही. हॉल तिकिटासाठी हे विद्यार्थी दादर आयटीआय आणि एसटी वर्कशॉपमध्ये चकरा मारत होते. पण त्यांना हॉल तिकीटच तयार नसल्याचे समजले. काही गोंधळ झाल्याचे लक्षात येताच या विद्यार्थ्यांनी युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत युवासेना सिनेट सदस्य मिलिंद साटम, धनराज कोहचाडे यांनी आयटीआय विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर चूक लक्षात आल्यावर केंद्रीय मंत्रालयाने या विद्यार्थ्यांसाठी नव्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले.
ऍप्रेंटिसचे गुण अपलोड करण्यास सुरुवात
आयटीआयच्या वेबसाईटवर ऍप्रेंटिसचे गुण अपलोड करण्यास सुरुवात झाली आहे. 3 जूनपर्यंत हे गुण तसेच शिल्लक परीक्षा अर्जदेखील भरता येणार आहे. प्रॅक्टिकल आणि इंजिनीअरिंगच्या ड्रॉइंग परीक्षेसाठी परीक्षा केंद्राची नोंद करण्यासाठी 4 ते 6 जूनपर्यंत मुदत आहे.
नव्या परीक्षेचे वेळापत्रक
हॉलतिकीट डाऊनलोड – 7 जूनपासून पुढे
मॉक टेस्ट प्रॅक्टिस सेशन – 7 जूनपासून पुढे
इंजिनीयरींग ड्रॉईंग – 11 जून
प्रॅक्टिकल परीक्षा – 12 ते 14 जून
थेअरी विषयांची ऑनलाईन परीक्षा – 26 ते 28 जून





























































