महामार्गावर अवैध गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीची कारवाई, 76 हजार 800 रुपयांची दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे पणदूर येथे अवैध दारू वाहतूकीवर केलेल्या कारवाईत 76 हजार 800 रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह 3 लाख 76 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अवैध दारू वाहतूककेल्या प्रकरणी वाहन चालक संतोष नारायण कुडतरकर (34) रा. माणगाव मळावाडी, कुडाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कुडाळ पणदूर अशी पेट्रोलिंग करत असताना आज शुक्रवारी (5 एप्रिल) पहाटे 5 वाजता मारुती अल्टो कार (एमएच 07 क्यू 1946) सुसाट वेगाने येताना या पथकाला दिसली. ही गाडी तपासणीसाठी चालकाला थांबण्याचा ईशारा करण्यात आला. मात्र चालकाने गाडी न थांबवल्याने या गाडीचा एलसीबीच्या पथकाने पाठलाग करत गाडी थांबवून तपासणी केली. त्यावेळी या वाहनामध्ये सुमारे 76 हजार 800 रूपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. त्यामुळे ही दारू आणि 3 लाखाची कार असा मिळून एकूण 3 लाख 76 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्या प्रकरणी संतोष नारायण कुडतरकर यांना अटक करून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.