मध्य पूर्वेतील तणावाचा फटका, 1 मार्च रोजी हिंदुस्थानी विमान कंपन्यांची 350 उड्डाणे रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका–इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आणि आखाती प्रदेशातील हवाई क्षेत्र बंद झाल्याने निर्माण झालेल्या अडचणींमुळे रविवारी (1 मार्च) हिंदुस्थानी विमान कंपन्यांची एकूण 350 उड्डाणे रद्द करण्यात आली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) X वरील निवेदनात ही माहिती दिली.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, “मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावर निर्बंध आले असून 1 मार्च रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांची 350 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.” याआधी 28 फेब्रुवारी रोजीही 410 उड्डाणे रद्द झाली होती.

प्रवाशांनी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधून आपल्या उड्डाणाची अद्ययावत माहिती तपासावी आणि आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी समन्वय ठेवावा, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

मुंबई–दिल्ली विमानतळांवर 225 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

रविवारी मुंबई आणि दिल्ली विमानतळांवर एकूण 225 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यापैकी मुंबई विमानतळावर 125, तर दिल्ली विमानतळावर किमान 100 उड्डाणे रद्द झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारत–युरोप आणि भारत–अमेरिका मार्गांवरही परिणाम

हवाई क्षेत्र बंद किंवा निर्बंधित असल्याने लांब पल्ल्याच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. रविवारी भारत–युरोप आणि भारत–अमेरिका मार्गांवरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. देशातील प्रमुख विमानतळांनी प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी विमान कंपनीकडून माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

इराणने बहरेन, कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE)वर प्रत्युत्तरात्मक हल्ले केल्यानंतर इराण, इस्रायल, इराक, कतार, यूएई, बहरेन, कुवेत आणि जॉर्डन या आठ देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

जागतिक विमानवाहतुकीवर मोठा परिणाम

फ्लाइट ट्रॅकर ‘फ्लाइटरडार24’नुसार, मध्य पूर्वेतील सात विमानतळांवर रविवारी 3,400 हून अधिक उड्डाणे रद्द झाली. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक हवाई क्षेत्रे बंद असल्याने कोविडनंतरचा सर्वात मोठा जागतिक विमानवाहतूक संकट निर्माण झाल्याचे मानले जात आहे. जगातील सर्वाधिक व्यस्त हवाई मार्गांपैकी एक प्रभावीपणे बंद झाला असून तो पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत अनिश्चितता आहे.

Emirates ने दुबईकडे ये-जा करणारी सर्व उड्डाणे किमान रविवारी दुपारपर्यंत स्थगित केली आहेत. Qatar Airways च्या माहितीनुसार कतार विमानतळ किमान सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. इस्रायलचे हवाई क्षेत्रही रविवारी बंदच राहिले. El Al या इस्रायली विमान कंपनीने हवाई क्षेत्र पुन्हा सुरू झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष मोहीम आखण्याची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले. सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांनी अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.