
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्यभरात शनिवारपासून प्लॅस्टिकची ‘नाकाबंदी’ होणार हे नक्की. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी, नाक्यानाक्यांवर अधिकाऱयांची करडी नजर राहणार आहे. ज्याच्या हातात प्लॅस्टिक वा प्लॅस्टिक पिशवी सापडेल त्याला पहिल्या वेळी ५ हजार रुपये, दुसऱया वेळी १० हजार तर तिसऱया वेळी २५ हजार आणि तीन महिन्यांची जेल असा दंड होणार आहे. दरम्यान, सकाळी ११ वाजल्यापासून प्लॅस्टिकविरोधी कारवाईला सुरुवात होणार आहे.
२३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचे राज्य सरकारने आधीच जाहीर केले होते. मात्र या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उच्च न्यायालयाने प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना उद्यापासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयातील बैठकीनंतर केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्लॅस्टिकबंदीबाबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत अधिकारी उपस्थित होते. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही बैठकीला उपस्थित होते.
प्लॅस्टिकबंदी एका दिवसात लादली गेलेली नाही. गेल्या वर्षी ६ सप्टेंबरला याची घोषणा करण्यात आली होती. गुढीपाडव्यापासून बंदी लागू करण्यात येणार होती. त्यानंतरही तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला. देशातील १७ राज्यांनी आधीच बंदी घातली आहे. बंदी घालणारे महाराष्ट्र हे १८ वे राज्य आहे. ब्रँडेड वेफर्स, बेकरी प्रॉडक्ट यांना तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र त्यांनाही रिकाम्या पिशव्यांच्या रिसायकलिंगचा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
घरातल्या या वस्तू वगळल्या
घरातल्या नियमित वापरात तब्बल ८० टक्क्यांवर वस्तू प्लॅस्टिकच्या असतात. त्यामुळे लोकांमध्ये ‘प्लॅस्टिकबंदी’च्या निर्णयाने प्रचंड भीती निर्माण झाली आहे. मात्र यात घरात पाण्यासाठी वापरले जाणारे टब, धान्य ठेवण्यासाठी वापरले जाणारे डबे, झाडू, पेन, इलेक्ट्रिक वस्तू, प्लॅस्टिकचे सामान, खुर्च्या, पाण्याच्या बॉटल अशा वारंवार वापरल्या जाणाऱया वस्तू बंदीतून वगण्यात आल्या असल्याचे मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
मासे, मटणासाठी स्टिलचा डबा घेऊन जा
हॉटेलमधून प्लॅस्टिकचे डबे किंवा कंटेनरमध्ये जर गरम जेवण ठेवलं तर त्यातील केमिकलची प्रक्रिया अन्नाशी होते. यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे घरातून डबा घेऊन जेवण आणलं तर ते अधिक आरोग्यदायी ठरेल. मटण कसं आणायचं? मासे कसे आणायचे? असे प्रश्न विचारले जात आहेत. यासाठी याआधी लोक डबा घेऊन जात होते तसाच डबा घेऊन गेलं तर ती सवय पुन्हा लागेल, असे रामदास कदम यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे हेच प्लॅस्टिक बंदीचे जनक
आदित्य ठाकरे यांनी प्लॅस्टिक बंदीसाठी प्रयत्न केले. स्वतः पुढाकार घेऊन अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी यासाठी त्यांचा आग्रह होता. त्यामुळे खऱया अर्थाने ते प्लॅस्टिक बंदीचे जनक आहेत, असे गौरवोद्गार पर्यावरणमंत्र्यांनी काढले.
न्यायालयाचे शिक्कामोर्तब
सरकारने प्लॅस्टिकबंदीबाबत ठाम भूमिका घेतल्याने प्लॅस्टिक आणि थर्माकॉल निर्मार्त्यांनी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. प्लॅस्टिकबंदी करताना अन्य कोणताही पर्यायी मार्ग सुचवण्यात आलेला नाही. तसेच प्लॅस्टिकबंदीमुळे प्लॅस्टिक उत्पादक, विक्रेते आणि साठवणूक करणाऱया व्यावसायिकांचे नुकसान होत असून या प्लॅस्टिकबंदीवर स्थगिती आणावी, अशी मागणी राज्यातील प्लॅस्टिक, थर्माकॉल व्यावसायिकांनी केली. परंतु प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र हायकोर्टाने यासंदर्भात याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी तीन आठवडय़ांचा अवधी दिला असून २० जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे.
सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार
प्लॅस्टिकनिर्मितीच पूर्णपणे बंद होणार असल्याने सर्वसामान्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. प्लॅस्टिकबंदीनंतरही याचा वापर करणाऱयाला दंड होणार असला तरी त्याचा अतिरेक होणार नाही, सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही याची आपण तत्त्वतः खबरदारी घेऊ, असा दिलासा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. शासन मुळावरच घाव घालणार आहे. म्हणजे प्लॅस्टिकनिर्मिती होणारच नाही याकडे लक्ष देणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही, असे कदम म्हणाले.
यावर आजपासून बंदी
- प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या. पातळ-जाड, बंध असलेल्या-नसलेल्या सर्व पिशव्या.
- थर्माकॉल व प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या व एकदाच वापरून फेकल्या जाणाऱया वस्तू. उदा. ताट, वाटय़ा, ग्लास, चमचे इत्यादी.
- उपाहारगृहात अन्न देण्यासाठी वापरले जाणारे डबे, स्ट्रॉ, नॉनवोव्हन पॉलिप्रॉपिलेन बॅग.
- नारळपाणी, चहा, सूप इ. पातळ पदार्थ देण्यासाठी वापरण्यात येणाऱया पिशव्या व कप.
- थर्माकोल व प्लॅस्टिकचे सजावट साहित्य.या वस्तूंसाठी तूर्त बंदी नाही
- उत्पादकांकडूनच प्लॅस्टिकच्या वेष्टनात येणारे पदार्थ. उदा. ब्रॅण्डेड वेफर्स, चिवडा इत्यादी.
- ब्रॅण्डेड शर्ट, ड्रेस, साडय़ा यांची उत्पादकांकडून गुंडाळलेली प्लॅस्टिक वेष्टने.
- ब्रॅण्डेड दूध, तेल असलेल्या जाड प्लॅस्टिक पिशव्या तसेच बाटलीबंद पाणी.
- शेती, रोपवाटिका, ओला कचरा जमा करण्यासाठी वापरण्यात येणाऱया पिशव्या.
- औषधांसाठी व रुग्णालयात वापरल्या जाणाऱया वस्तू.
प्लॅस्टिकबंदीबाबत मुंबईकरांच्या प्रबोधनासाठी वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये आयोजित भव्य प्रदर्शनाचा शुभारंभ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाला. त्याप्रसंगी पर्यावरणमंत्री रामदास कदम, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आदी उपस्थित होते. वृत्त पान ३
निळय़ा गणवेशातील निरीक्षकांची फौज
प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने २०० पेक्षा अधिक निरीक्षकांची फौज तयार केली आहे. त्यांना विशिष्ट गणवेश आणि ओळखपत्र देण्यात आले आहे. निळ्या रंगाचा कोट आणि काळ्या रंगाची कॅप असून त्यावर ‘प्लॅस्टिक निर्मूलन पथक’ असे लिहिलेले आहे.
गुज्जूभाईंचा मुख्यमंत्र्यांवर दबाव
८० टक्के प्लॅस्टिक निर्माते हे गुजरातमधील असून महाराष्ट्रातील प्लॅस्टिकबंदीमुळे बेरोजगारी होणार असेल तर ती गुजरातमध्ये होईल. म्हणूनच मुख्यमंत्र्यांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही याची कल्पना मला होती. मात्र प्लॅस्टिकबंदीच्या या मोहिमेत मुख्यमंत्र्यांची पत्नीच शासनासोबत असल्याने मुख्यमंत्र्यांचं काही चालणार नाही याची मला माहिती होती. म्हणूनच प्लॅस्टिकबंदीचा एक चांगला कायदा आणला, असे पर्यावरणमंत्री म्हणाले. बंदी घातलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू संकलित करण्यासाठी मुंबई महापालिकेने ३७ केंद्रे सुरू केली आहेत. दहा किलोंपेक्षा जास्त प्लॅस्टिक जमा असल्यास पालिका वाहन पाठवून ते गोळा करणार आहे.
मखरनिर्मात्यांना दिलासा
महाराष्ट्रात आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. गणपतीसाठी मोठय़ा प्रमाणात थर्माकोलचा वापर होतो. या मखरनिर्मात्यांच्या शिष्टमंडळानेही रामदास कदम यांची भेट घेतली. आम्ही गणेशोत्सवाची तयारी आठ ते दहा महिने आधीपासूनच करत असतो. यामुळे थर्माकोलची खरेदी आम्ही आधीच करून ठेवली आहे. फक्त या वर्षी थर्माकोलच्या मखरांना परवानगी देण्यात यावी. आम्ही बनविलेले प्रत्येक मखर ग्राहकाकडून परत घेऊ. विकलेल्या प्रत्येक मखराची नोंद महापालिकेला देऊ व परत घेतलेले मखर नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात देऊ. तसे प्रतिज्ञापत्रही द्यायला आम्ही तयार आहोत, अशी विनंती या शिष्टमंडळाने आपल्याला केली. मखरनिर्मात्यांच्या शिष्टमंडळाच्या विनंतीचा उच्चस्तरीय समितीमध्ये विचार करण्यात येईल व त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.






























































