
सुकळवाड ग्रामसचिवालय नूतन इमारतीचे उदघाटन शुक्रवारी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन जनसुविधा, जी.प., पं.स., ग्रा. प. 15 वा वित्त आयोग, जिल्हा परिषद सदस्य स्वनिधी असा एकूण 33 लाख रु च्या निधीतून ग्रामपंचायतची भव्य दिव्य इमारत उभारण्यात आली आहे. यावेळी सरपंच वैभवी मोरजकर व अन्य उपस्थित होते.
यावेळी दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थित मान्यवर व माजी सरपंच, आरोग्य कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील कमर्चारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
सुकळवाड मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सुमारे अडीच कोटीची कामे झाली असल्याची माहिती खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळ, मुंबई गोवा महामार्ग असे मोठे प्रकल्प जिल्ह्यात मार्गी लागले आहेत. येत्या काळातही जास्तीत जास्त निधी या भागासाठी दिला जाईल. निधीची कमतरता भासणार नाही. ग्रामपंचायतच्या सभामंडपासाठी देखील निधी दिला जाईल अशी ग्वाही विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी दिली.
तर मालवण तालुक्यातील वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारत लोकार्पण सोहळा शुक्रवारी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.



























































