मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार- पालकमंत्री रवींद्र वायकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा दुरूस्तीकडे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात आज मिऱ्यावासिंद एकजूटीने रस्त्यावर उतरले. ग्रामस्थांनी आज प्रशासनाच्या गाड्या अडवून आंदोलन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहाबाहेर संतप्त जमावाला पालकमंत्री रवींद्र वायकर सामोरे गेले. मी सुध्दा तुमच्या बाजूने आहे. लवकरच सीआरझेड संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ तसेच संबधित ठेकेदाराची चौकशी करू, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी ग्रामस्थांना दिले.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या लाटांनी वाहून गेला आहे. पावसाळ्यात समुद्राचे पाणी लोकवस्तीत शिरते. मोठ्या प्रमाणात किनारा गिळंकृत केल्यामुळे पुढील पावसाळ्यात धोका कायम आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी मोर्चा काढला. पांढरा समुद्र येथून निघालेल्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. दरम्यान पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या गाड्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताच ग्रामस्थांनी प्रशासनाच्या गाड्या अडवल्या. जिल्हापरिषदेच्या गाडीत शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक होते. दुसऱ्या एका गाडीत शिवसेनेच्या महिला संघटक शिल्पा सुर्वे होत्या. परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

त्यानंतर ग्रामस्थांना घेऊन सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक आणि शिल्पा सुर्वे चालत शासकीय विश्रामगृह येथे आले. विश्रमागृहाच्या आवारात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पालकमंत्री रवींद्र वायकर विश्रामगृहाबाहेर आले आणि त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर वायकर म्हणाले की, मी तुमच्या बाजूने आहे. तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मिऱ्या ते पांढरा समुद्र सागरी धुप प्रतिबंधक बंधारा तसेच मच्छिमारांच्या समस्यांबाबत आंदोलन करणाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार यासंदर्भात येत्या १५ दिवसात मिऱ्यावासिय सर्व ग्रामस्थ, मच्छीमार व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत प्राथमिक बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती या प्रश्नावर एका बैठकीचे आयोजन करून आंदोलकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात करेन असे आश्वासन पालकमंत्री वायकर यांनी दिले.

यावेळी जि. प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, सरपंच आरती पाटील, अप्पा वांदरकर, विकास सावंत, दिनेश सावंत, तनया शिवलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.