जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी 5 संघांत चुरस

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या बहुचर्चित कसोटी क्रिकेट मालिकेस गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) फायनल गाठण्यासाठी यजमान टीम इंडियासाठी ही कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘डब्ल्यूटीसी’ गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक 75.56 टक्के गुणांसह अव्वल स्थानी, तर हिंदुस्थान 58.93 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र ‘डब्ल्यूटीसी’ची फायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थानसह दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व वेस्ट इंडीज या संघांमध्ये चुरस आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या 4 कसोटी सामन्यांची मालिका जिंकणारा संघ ‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलचे तिकीट बुक करणार एवढे नक्की.

ऑस्ट्रेलियासाठी एक विजयही पुरेसा

ऑस्ट्रेलिया संघ सध्या 75.56 टक्के गुणांसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे ‘डब्ल्यूटीसी’ची फायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थानविरुद्ध चारपैकी केवळ एक कसोटी जिंकणेही पुरेसे ठरणार आहे, मात्र हिंदुस्थानने ही मालिका 4-0 फरकाने जिंकल्यास ऑस्ट्रेलियन संघ गोत्यात येऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेची मदार गावसकरबॉर्डर ट्रॉफीवर

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध 2-0 असे निर्भेळ यश संपादन केले तरी त्यांचे ‘डब्ल्यूटीसी’ फायनलमधील स्थान पक्के होणार नाहीये. दुसरीकडे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानची मालिका बरोबरीत सुटण्यासाठी आणि याचबरोबर न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करण्यासाठीदेखील दक्षिण आफ्रिकेला देवाकडे साकडे घालावे लागणार आहे.

चमत्कार झाला तरच विंडीजला संधी

वेस्ट इंडीजची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे. केवळ काही चमत्कार घडला तरच हा संघ ‘डब्ल्यूटीसी’ची फायनल गाठू शकतो. चमत्कार म्हणजे यासाठी ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 4-0 फरकाने पराभव करायला हवा. वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेवर 2-0 असा विजय मिळवायला हवा. न्यूझीलंडने श्रीलंकेला 2-0 किंवा 1-0 असे हरवायला हवे.

हिंदुस्थानला मालिका जिंकावीच लागेल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 1-0 फरकाने जिंकली तरी पुरेशी ठरणार आहे,  मात्र उभय संघांमधील मालिका बरोबरीत सुटल्यास दक्षिण आफ्रिका व श्रीलंका या संघांना ‘डब्ल्यूटीसी’ची फायनल गाठण्याची संधी मिळणार आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 फरकाने बाजी मारल्यास हिंदुस्थानला जर-तरच्या समीकरणावर अवलंबून राहावे लागेल. वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेला आणि न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत केले तर मग हिंदुस्थानला ‘डब्ल्यूटीसी’ची फायनल गाठण्याची संधी असेल.