INDvsNZ न्यूझीलंडने कानपूर कसोटी वाचवली, रचिनच्या चिवट खेळामुळे सामना अनिर्णित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - बीसीसीआय

अखेरपर्यंत रोमहर्षक झालेली कानपूर कसोटी पाहुण्या न्यूझीलंड संघाने वाचवली आहे. हिंदुस्थानचा संघ विजयापासून अवघा एक विकेट दूर राहिला. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र याने चिवट खेळ करत पराभव टाळला. रचिनने जवळपास 15 षटकं खेळून काढली.

न्यूझीलंडला विजयासाठी अखेरच्या दिवशी 280 धावांची, तर हिंदुस्थानला 9 विकेट्ची आवश्यकता होती. परंतु हिंदुस्थानचा संघ 8 विकेट्स घेऊ शकला. दुसऱ्या डावात आर. अश्विनने 3, रविंद्र जाडेजाने 4 आणि अक्षर पटेल व उमेश यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.

न्यूझीलंडने पाचव्या दिवशी 1 बाद 4 धावांवरून आपला दुसरा डाव सुरू केला. सकाळच्या सत्रामध्ये हिंदुस्थानच्या गोलंदाजांना जास्त विकेटस मिळाल्या नाहीत. परंतु लंचनंतर मात्र हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले.

न्यूझीलंडचे फलंदाज एकामागोमाग एक फिरकीच्या जाळ्यात अडकत गेले. चहापानापर्यंत न्यूझीलंडच्या 5 विकेट्स गेल्या होत्या. चहापानानंतर न्यूझीलंडने चार विकेट्स लवकर गमावल्या. विजय हिंदुस्थानच्या संघाचाच होणार असे वाटत असतानाच रचिन रविंद्र याने चिवट खेळ केला.

न्यूझीलंडचा नववा खेळाडू 89.2 षटकात बाद झाला होता. त्यानंतर जवळपास 10 9 षटकांचा खेळ बाकी होता. ही नऊ षटके रचिन रविंद्र आणि एजाज पटेल यांनी खेळून काढली. रचिन 18 धावा तर एजाज 2 धावा काढून नाबाद राहिला.

हिंदुस्थान पहिला डाव – 345 धावा.
न्यूझीलंड पहिला डाव – 296 धावा.

हिंदुस्थान दुसरा डाव – 7 बाद 234 धावांवर घोषित
न्यूझीलंड दुसरा डाव – 9 बाद 165 धावा