एचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्यूयॉर्क

हिंदुस्थानात क्षयरोग आणि एचआयव्ही लागण झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण 84 टक्क्यांनी घटले आहे. युनायटेड नेशन्स प्रोगॅम ऑन एचआयव्ही/ एड्स अंतर्गत 2020 हे वर्ष क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य ठरवण्यात आले होते. मात्र त्याआधीच 3 वर्षे 20 पेक्षा अधिक राष्ट्रांनी हे उद्दिष्ट गाठले आहे. आजच्या जागतिक क्षयरोग दिनी ही माहिती संयुक्त राष्ट्रातर्फे देण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, क्षयरोग आणि एचआयव्ही असलेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाने मरण पावणार्‍या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. 2010 साली ही संख्या 5 लाख 20 हजार होती, ती 2017 साली 3 लाख इतकी खाली आहे. हिंदुस्थानात तर रुग्णांचा मृत्यू होणाचे प्रमाण कमालीचे म्हणजेच 84 टक्क्यांनी घटले आहे. त्याखालोखाल डजिबोटी आणि मालावी या देशांचा क्रमांक लागतो. 18 पेक्षा अधिक राष्ट्रांनी क्षयरोग मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे 50 टक्के लक्ष्य गाठले आहे. 2020 च्या वर्षाअखेर पूर्ण लक्ष्य गाठण्याचे ध्येय या राष्ट्रांचे आहे. योग्य उपचारांनी क्षयरोग पूर्ण बरा होतो. मात्र एचआयव्ही असलेल्या क्षयरोग रुग्णांच्या जीवाला अधिक धोका असतो. क्षयरोग आणि एड्सचे निर्मूलन करण्यसाठी योग्य पावले उचलली पाहिजेत, असे युएनच्या एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मिशेल सिदिबे यांनी सांगितले.