
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हिंदुस्थानच्या स्वारीवर डेरेदाखल झालाय. मात्र, क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या टीम इंडियाचा चौखुर उधळलेला अश्वमेध रोखण्याचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलियन संघापुढे असेल. कारण गेल्या दहा वर्षांत हिंदुस्थानने मायदेशात सलग 15 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. या कालावधीत झालेल्या 43 कसोटींमध्ये टीम इंडियाने केवळ दोन वेळा पराभवाचे तोंड बघितले आहे. त्यामुळे यावेळीही कांगारूंसाठी हिंदुस्थानचा दौरा खडतर असेल, अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहे.
मायदेशात हिंदुस्थानला हरवणे अवघड
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया बहुचर्चित कसोटी मालिकेस गुरुवारपासून नागपूरमध्ये प्रारंभ होणार आहे, मात्र इतिहासात डोकविल्यास हिंदुस्थानला मायदेशात हरवणे अवघड आहे. कारण 2013 सालापासून टीम इंडिया मायदेशात अजेय आहे. या दहा वर्षांत हिंदुस्थानने सलग 15 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम फक्त हिंदुस्थानच्या नावावर आहे. हिंदुस्थानने या 15 मालिकांतील 9 मालिकांत निर्भेळ यश मिळविलेले आहे हे विशेष. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या बलाढय़ संघांना हिंदुस्थान दौऱयावर कसोटी मालिकेत यश मिळविता आलेले नाही. फक्त 2012 मधील कसोटी मालिकेत इंग्लंडने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हिंदुस्थानात येऊन 2-1 फरकाने हरविण्याचा पराक्रम केला होता, मात्र त्यानंतर पुन्हा ते इंग्लंडला कधी शक्य झाले नाही.
42 पैकी 34 विजय, 2 पराभव
टीम इंडियाने 2013 पासून मायदेशात 42 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 34 कसोटी हिंदुस्थानने जिंकल्या असून, केवळ 2 सामने गमावले आहेत. इतर 6 कसोटी सामने ड्रॉ झालेले आहेत. म्हणजेच दहा वर्षांत टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 80.95 टक्के होती. हिंदुस्थाननंतर ऑस्ट्रेलिया दुसऱया क्रमांकावर असून त्यांनी 1998 ते 2007 या दहा वर्षांच्या कालावधीत घरच्या मैदानावर 79.66 टक्के कसोटी सामने जिंकले होते. या कालावधीत त्यांनी 59 कसोटी सामन्यांत 47 विजय मिळविले होते.
दृष्टिक्षेपात…
– हिंदुस्थानने मायदेशात 15 पैकी 9 कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळविले आहे.
– ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व श्रीलंका या संघांविरुद्ध निर्भेळ यश.
– दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थानात आठ वेळा पराभव.
– हिंदुस्थानने मायदेशात जिंकलेल्या 34 कसोटींतील 31 सामने एकतर्फी जिंकले.
– 34 मधील 14 कसोटी डावाच्या फरकाने जिंकल्या.
– हिंदुस्थानने मायदेशातील 10 कसोटी 200 हून अधिक धावांनी, तर 2 कसोटी 100 हून अधिक धावांनी जिंकल्या आहेत.
– विकेटच्या हिशेबाने हिंदुस्थानने मायदेशात 2 कसोटी 10 विकेट राखून, तर 3 कसोटी 8 विकेट राखून जिंकल्या आहेत.
मायदेशात पाहुण्यांची फिरकी
हिंदुस्थानी खेळपट्टय़ा या फिरकीधार्जिण्या असतात. हिंदुस्थानी दौऱयावर येणाऱया परदेशी संघातील फलंदाजांची हिंदुस्थानी फिरकी गोलंदाजांपुढे तारांबळ उडते. त्यात हिंदुस्थानकडे रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा अशी फिरकीची सर्वोत्तम जोडगोळी आहे. गेल्या दहा वर्षांत याच जोडगोळीने पाहुण्यांची फिरकी घेतलेली आहे. अश्विनने मायदेशातील 42 कसोटींत 258 विकेट घेतल्या असून यात 19 वेळा एका डावात पाचहून अधिक फलंदाज बाद केलेले आहेत. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 8 कसोटींत 50 बळी टिपलेले आहे, तर जाडेजाच्या नावावरही 49 बळी आहेत.



























































