‘टीम इंडिया’चे स्वप्न भंगले, सनसनाटी विजयासह न्यूझीलंड सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मँचेस्टर

रथी-महारथी खेळाडूंनी सजलेल्या ‘टीम इंडिया’चे तिसर्‍यांदा जगज्जेतेपदाचा करंडक जिंकण्याचे स्वप्न बुधवारी भंगले. न्यूझीलंडने 239 या असुरक्षित धावसंख्येचा बचाव करताना हिंदुस्थानला 49.3 षटकांत 221 धावांत गुंडाळून 18 धावांनी विजय मिळवीत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. हिंदुस्थानच्या सलामीच्या जोडीचा कर्दनकाळ ठरलेला मॅट हेन्री या विजयाचा शिल्पकार ठरला.

आघाडीच्या फळीची एकांकिका

न्यूझीलंडकडून मिळालेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची अतिशय खराब सुरुवात झाली. रोहित शर्मा (1), कर्णधार विराट कोहली (1) व लोकेश राहुल (1) ही आघाडीची फळी केवळ 3.1 षटकांत अवघ्या 5 धावांत तंबूत परतली. हे तिघेही फलंदाज एकेका धावेवर बाद झाले हे विशेष. मॅट हेन्रीने दुसऱयाच षटकात रोहित शर्माला यष्टीमागे लॅथमकरवी झेलबाद केले, तर त्याच्या जागेवर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला ट्रेंट बोल्टने पायचीत करून हिंदुस्थानला दुसरा मोठा धक्का दिला. कोहलीने पॅव्हेलियनमध्ये परतून बॅट खाली ठेवायच्या आधी दुसरा आघाडीवीर लोकेश राहुलली माघारी परतला. त्यालाही हेन्रीने यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडले.  

किवींच्या 23 चेंडूंत 28 धावा

न्यूझीलंडने मंगळवारी 46.1 षटकांत 5 बाद 211 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली असताना पावसाच्या व्यत्ययामुळे पुढचा खेळ होऊ शकला नाही. बुधवारचा राखीव दिवस असल्याने न्यूझीलंडने उर्वरित 23 चेंडूंत 28 धावा करून 8 बाद 239 धावसंख्या उभारली.  

जाडेजा–धोनी लढले, पण…

महेंद्रसिंग धोनी (50) आणि रवींद्र जाडेजा (77) यांनी सातव्या गडय़ासाठी 116 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानच्या आशा पल्लवित केल्या होत्या. धोनी खेळपट्टीवर उभा राहिल्याने जाडेजाला मुक्त फलंदाजी करता आली. त्याने 59 चेंडूंत 77 धावांची खेळी केली. बोल्टला फटकावताना जाडेजाने विल्यम्सनकडे झेल दिला. पुढच्याच षटकात धोनीही बाद झाला आणि हिंदुस्थानचा पराभव अधोरेखित झाला.  

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : हेन्री निकोल्स त्रि. गो. जाडेजा 28, केन विल्यम्सन झे. जाडेजा गो. चहल 67, रॉस टेलर धावबाद (जाडेजा) 74. अवांतर : 18, एकूण : 8 बाद 239 धावा.  गोलंदाजी : भुवनेश्वर 10-1-43-3, बुमराह 10-1-39-1, पांडय़ा 10-0-55-1, जाडेजा 10-0-34-1, चहल 10-0-63-1.

हिंदुस्थान : रिषभ पंत झे. ग्रॅण्डहोम गो. सॅण्टनर 32, हार्दिक पांडय़ा झे. विल्यम्सन गो. सॅण्टनर 32, महेंद्रसिंग धोनी धावबाद (गप्टील) 50, रवींद्र जाडेजा झे. विल्यम्सन गो. बोल्ट 77. अवांतर : 16, एकूण : 49.3 षटकांत 221 धावा. गोलंदाजी : बोल्ट 10-2-42-2, हेन्री 10-1-37-3, फर्ग्युसन 10-0-43-1, निशाम 7.3-0-49-1, सॅण्टनर 10-2-34-2.