देशात बुलेट ट्रेनची नव्हे, सुरक्षित रेल्वे प्रवासाची गरज!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बुलेट ट्रेन केवळ उच्चभ्रू किंवा धनदांडग्यांसाठी आहे. एका खास वर्गासाठीच ती आणली जात आहे. सर्वसामान्य लोकांना ती परवडणारच नाही. हिंदुस्थानातील लोकांना खरी गरज आहे ती सुरक्षित रेल्वे प्रवासाची. सध्या अस्तित्वात असलेली रेल्वेसेवा स्वच्छ, वेगवान आणि सुरक्षित करण्याची. अशी स्पष्टोक्ती मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली. हिंदुस्थानी रेल्वेसेवेबाबत त्यांनी आपली मते मोकळेपणाने या मुलाखतीत मांडली.

हिंदुस्थानी रेल्वे २० वर्षे मागे
विकसित देशांमधील रेल्वेसेवेच्या तुलनेत हिंदुस्थानची रेल्वेसेवा तब्बल २० वर्षे मागे असल्याचे ई. श्रीधरन यांनी सांगितले. देशातील रेल्वेसेवेत कुठल्याही प्रकारचा वेगवान बदल झालेला नाही. बायो टॉयलेट्सची सुविधाही तांत्रिकदृष्टय़ा आणखी विकसित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

देशातील एकतृतीयांश जनता दारिद्र्यरेषेखाली
देशाच्या प्रगतीचा वेग वाढलेला नाही. आर्थिक विकास दरातही विशेष फरक पडलेला नाही. उलट देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही देशातील एक तृतीयांश जनता दारीद्र्यरेषेखालीच असल्याचे मतही ई.श्रीधरन यांनी मांडले. याला जबाबदार देशातील नेतेमंडळी असून हे नेते आपले राजनैतिक लक्ष्य गाठण्यालाच सर्वाधिक महत्त्व देतात असे परखडत मतही त्यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.