
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जबरदस्त टक्कर देण्याच्या उद्देशानं जागावाटप, संयुक्त प्रचाराची ब्ल्यू प्रिंट आणि रणनीती आखणे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष INDIA आघाडीची मंगळवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या योजनेवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
13 डिसेंबरच्या लोकसभेच्या सुरक्षेतील कमीवरून निदर्शने आणि घोषणाबाजी केल्याबद्दल विविध विरोधी पक्षांच्या 141 खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. याच दरम्यान आज INDIA आघाडीची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
INDIA आघाडीची आज चौथी बैठक दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये होत आहे. पहिली बैठक 23 जून रोजी पाटणा येथे पार पडली. दुसरी बैठक 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे आणि तिसरी बैठक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मुंबईत झाली, जिथे 27 विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा एकजुटीनं निवडणूक लढविण्याचा ठराव मंजूर केला होता.
या आधी नितीश कुमार, ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी बैठकीत हजर न राहण्याचा निर्णय घेतल्यानं INDIA आघाडीची बैठक 17 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी सुप्रीमो लालू यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
हेमंत सोरेन, जे आज दिल्लीतील INDIA आघाडीच्या बैठकीला त्यांच्या कडक वेळापत्रकामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)चे हेमंत सोरेन त्यांचे तीन प्रतिनिधी बैठकीसाठी पाठवतील. या बैठकीत सहभागी होण्यासाठी राज्यसभा खासदार महुआ माझी, लोकसभा खासदार विजय हंसदा आणि पक्षाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांची नावं सुचवण्यात आली आहेत.
सोमवारी ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीनंतर देशभरातील आघाडीतील पक्षांच्या प्रचारसाठी त्यांनी तयारी दर्शवली.
नुकत्याच झालेल्या पराभवामुळे खचून न जाता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ते सकारात्मक अजेंडा घेऊन भाजपला सामोरे जाण्यासाठी पुढे जातील आणि लोकांच्या समस्यांवर प्रकाश टाकतील.
दरम्यान, विरोधकांच्या संयुक्त रॅलीच्या योजनांना दिल्लीच्या बैठकीत लवकरच अंतिम रूप देण्यात येण्याची शक्यताही बोलली जात आहे.






























































