
ऑगस्टच्या सुरुवातीपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने 44 वर्षांनंतर नवीन विक्रम रचला आहे. जुलैमध्ये सरासरीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी बरसलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक अशी विक्रमी हजेरी लावली. देशात 1976 नंतर पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने शनिवारी दिली. पावसाचा जोर सप्टेंबरमध्ये कमी होईल, असा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
देशात 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीत तब्बल 296 मिमी. इतका विक्रमी पाऊस पडला. ऑगस्टमध्ये देशात सरासरी237 मिमी. इतका पाऊस पडतो. यंदा जुलैमध्ये निराशाजनक हजेरी लावलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा तब्बल25 टक्क्यांनी अधिक बरसात करीत देशवासीयांचे पाण्याचे टेन्शन पळवून लावले. सन 1976च्या ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 28.4 टक्के अधिक पावसाची हजेरी लागली होती. 1901 ते 2020 यादरम्यानच्या ऑगस्टमधील पावसाच्या नोंदीनुसार सर्वाधिक पाऊस 1926 च्या ऑगस्ट महिन्यात कोसळला. त्या वर्षी सरासरीपेक्षा तब्बल33 टक्के अधिक पाऊस पडला होता.
देशात यंदा मध्य हिंदुस्थानात सर्वाधिक म्हणजेच सरासरीपेक्षा 57टक्के पाऊस झाला. तसेच पूर्व आणि ईशान्य भागात सरासरीपेक्षा 18 टक्क्यांनी कमी पाऊस पडला, असे हवामानशास्त्र विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
मान्सूनसंदर्भातील आमचे आतापर्यंतचे अंदाज खरे ठरले आहेत. पाऊस देशभरात सगळीकडे समाधानकारक पडला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कमी होईल. मात्र ऑगस्टमध्ये ज्या भागात कमी पाऊस झाला तेथे सप्टेंबरमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागेल.
– त्युंजय मोहापात्रा, महासंचालक, हवामानशास्त्र विभाग





























































