रोहित शर्माचे परदेशातील पहिलेच शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकर दिग्गज फलंदाज रोहित शर्माने ओव्हल कसोटीतील तिसरा दिवस गाजवला. हिंदुस्थानच्या या पठ्ठय़ाने दुसऱया डावात खणखणीत शतक झळकावले. हे त्याचे कसोटीतील आठवे शतक ठरले. रोहित शर्माचे परदेशातील हे पहिलेच शतक होय. याआधी झळकावलेली सात शतके त्याने हिंदुस्थानात केली होती. रोहित शर्माने एक षटकार व 14 चौकारांसह आपली 127 धावांची खेळी सजवली.

इंग्लंडचा पहिला डाव 290 धावांमध्ये आटोपल्यानंतर हिंदुस्थानची दुसऱया डावाची सुरुवात छान झाली. रोहित शर्मा व लोकेश राहुल (46 धावा) या जोडीने 83 धावांची दमदार सलामी दिली. लोकेश राहुल बाद झाल्यानंतर रोहित शर्माने चेतेश्वर पुजाराच्या साथीने हिंदुस्थानच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. पण दुसऱया नव्या चेंडूसह टाकत असलेल्या ओली रॉबीनसनच्या पहिल्याच षटकात रोहित 127 धावांवर तर पुजारा 61 धावांवर बाद झाला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा हिंदुस्थानने 3 बाद 270 धावा केल्या होत्या.