क्रिकेटवारी – लॉर्ड्सवर काय होणार?

>> संजय कऱ्हाडे

आज 10 जुलै. आपल्या सर्वांतर्फे सुनील गावसकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आता वळूया लॉर्ड्स कसोटीकडे. दुसऱ्या कसोटीत जे माप हिंदुस्थानी संघाने इंग्लंडच्या पदरात टाकलंय ते पाहता या कसोटीसाठी चेंडू स्विंग, सीम करणारी आणि चेंडूला उसळी देणारी खेळपट्टी दिसली तर आश्चर्य वाटायला नको! जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या संघात आलाय यातच सगळं आलं. दुखापतग्रस्त आर्चर तब्बल चार वर्षांनी कसोटीत परतलाय आहे तो खुद्द जेम्स अॅण्डरसनच्या शिफारशीमुळे.

आता अशा वेगवान खेळपट्टीवर आपल्या फलंदाजांसाठी पहिल्या दोन कसोटींपेक्षा वेगळा अनुभव असणार. लॉर्ड्सवर चेंडू स्विंग, सीम होईल, काना-नाकाजवळून शिट्टय़ा फुंकत जाईल. पण दुसऱ्या कसोटीत आत्मविश्वास देणारा अनुभव त्यांना मिळालाय. कप्तान गिल स्वतःच्या उदाहरणाने स्फूर्ती देतोय. त्यामुळे यशस्वी, राहुल, करुण, शुभमन, ऋषभ, जडेजा पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवतील ही आशा आणि अपेक्षा.

बुमरा, सिराज आणि आकाशदीप हेसुद्धा उत्साहात असतील. महत्त्वाचं, जी संधी इंग्लंडच्या गोलंदाजांना मिळणार आहे तीच संधी त्यांनाही मिळणार आहे! त्यात बुमराचे हात अधिक चाळवत असतील. त्याला स्वतःला पुन्हा एका नव्या अर्थाने सिद्ध करायचं आहे. त्याची ही भूक नवी असेल. आता या प्रयत्नात त्याने अनावश्यक प्रयोग केले नाहीत तर इंग्लंडचं जन-गण-मनं नक्की! एक मात्र पक्क, यापुढे या मालिकेत बुमरा विश्रांतीचं नाव घेणार नाही! सिराज आणि आकाशदीप बुमराच्या बरोबरीने गोलंदाजी करतील अशी खात्री वाटते.

आता, संघातल्या आणखी दोन जागांबद्दल. यापैकी एक प्रसिध कृष्णाला मिळावी असं माझं मत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत त्याची कामगिरी समाधानकारक नव्हती. पण खेळपट्टय़ा त्याला साथ देणाऱ्या नव्हत्या. आता या तिखट-मीठ लावलेल्या मसालेदार खेळपट्टीवरही त्याला संधी मिळणं आवश्यक आहे! अन्यथा त्याच्यावर अन्याय होईल. चार वेगवान गोलंदाज अधिक जडेजा आणि वॉशिंग्टन ही गोलंदाजी मस्त वाटते! राहिला प्रश्न नितीश कुमारचा. तळाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी त्याला संघात घेतलं होतं. पण फलंदाजीच मजबूत करायची तर तत्त्वतः साई सुदर्शनला संघात स्थान द्यायला हवं! तेही नाही तर कुलदीपला संधी द्या! चौथ्या-पाचव्या दिवशी तो परिणामकारक ठरू शकतो.

आता थांबायचं नाय… लॉर्ड्सवरही तिरंगा फडकवण्यासाठी गिल सेना सज्ज

थोडक्यात, प्रश्नांकित जागा एक. त्यासाठी पर्याय तीन. कौन टीम में आएगा कौन नहीं, हम को नहीं पता; हम को पुछ नहीं पता!!