सरकारने धर्मनिरपेक्षता शब्द हटवला तरी देशाचे संविधान धर्मनिरपेक्षच राहील! काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. एकमेकांबद्दल घृणा पसरवणारे सरकार धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानातून काढू पाहत आहे. त्यामुळे तसे झाले तरी देशाचे संविधान धर्मनिरपेक्षच राहील असा विश्वास काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केला. तसेच धर्मनिरपेक्षता हाच आपल्या संविधानाचा मूळ पाया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 ‘द बॅटल ऑफ बिलॉंगिंग’ या आपल्या नव्या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी एक मुलाखत दिली आहे. देशाचा चेहरा धर्मनिरपेक्ष असून कोणतीच ताकद तो बदलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाचा अवलंब करत आहे का या प्रश्नावर शशी थरूर म्हणाले, हिंदूवाद आणि हिंदुत्व यामध्ये फरक आहे. हिंदूवादाचा आम्ही सन्मान करतो, पण हिंदुत्व ही एक राजकीय विचारधारा असून ती एकमेकांमध्ये दरी निर्माण करत आहे.

आम्ही मंदिरात जाऊन कोणत्याही मवाळ आणि कट्टर हिंदुत्वाचे समर्थन करत नाही असे याआधीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असल्याचे थरूर यांनी यावेळी नमूद केले.

काँग्रेस पक्ष भाजपची लाईट व्हर्जन बनण्याचा धोका पत्करू शकत नाही

काँग्रेस मवाळ हिंदुत्वाचा अवलंब करत आहे का असे विचारले असता, काँग्रेसची हिंदुत्वबाबतची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदुत्वबाबत काँग्रेस पक्ष भाजपची लाईट व्हर्जन बनण्याचा धोका पत्करू शकत नाही. तसेच त्याबाबतचा प्रयत्नही करणार नसल्याचे शशी थरूर यांनी स्पष्ट केले.

तसे झाल्यास काँग्रेस पक्ष झिरोच्या दिशेने जाईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोल्ड्रिंक पेप्सीच्या लाईट व्हर्जनप्रमाणे पेप्सी लाईटला बीजेपी लाईट आणि कोक झिरोला काँग्रेस झिरो अशी तुलना करत उत्तर दिले.