हिंदुस्थानचा ऐतिहासिक मालिका विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ब्रिस्टोल

विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने यजमान इंग्लंडला तिसऱ्या व निर्णायक सामन्यात ७ गडय़ांनी धूळ चारून तीन सामन्यांची टी-२० क्रिकेट मालिका २-१ फरकाने जिंकून इतिहास घडविला. इंग्लंडमध्ये हिंदुस्थानने प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. विजयाचा हीरो ठरलेल्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक साजरे केले.

इंग्लंडकडून मिळालेले १९९ धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने १८.४ षटकांत ३ बाद २०१ धावा करून पूर्ण केले. शिखर धवन (५) आणि लोकेश राहुल (१९) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मात्र, आघाडीवीर रोहित शर्माने शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभे राहत हिंदुस्थानच्या हातातून विजय निसटणार नाही याची काळजी घेतली. त्याने कर्णधार विराट कोहलीच्या (४३) साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ८९ धावांची भागीदारी केली. धावफलकावर दीडशतक लावून कोहली बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंडय़ानेही (नाबाद ३३) रोहितला साथ देत हिंदुस्थानचा विजय सोपा केला. १४ चेंडूत ४ चौकार व २ षटकार लगावणाऱ्या पंडय़ाने षटकार ठोकूनच सामना संपविला. रोहित शर्माने १०० धावांच्या नाबाद खेळीत ५६ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकारांसह ५ षटकारांचा घणाघात केला.

त्याआधी नाणेफेकीचा कौल गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ९ बाद १९८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. जेसर रॉय (६७) व जोश बटलर (३४) यांनी टॉप गेअरमध्ये फलंदाजी करताना ७.५ षटकांत ९४ धावा फटकावून इंग्लंडला जबरदस्त सुरुवात करून दिली. सिद्धार्थ कौलने बटलरचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. बटलरने २७ चेंडूंच्या खेळीत ७ चेंडू सीमापार पाठविले. त्यानंतर देदणादण फलंदाजी करणाऱ्या जेसर रायने अॅलेक्स हेल्सच्या (३०) साथीने दहाव्या षटकात धावफलकावर शतक लावले. दीपक चहरने रायला यष्टीमागे धोनीकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला दुसरे यश मिळवून दिले. त्याने ६७ धावांच्या तडाखेबंद खेळीत ३१ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व ७ षटकारांचा घणाघात केला. हार्दिक पंडय़ाने कर्णधार इयॉन मोर्गनसह (६) हेल्सला बाद करत इंग्लंडची मधली फळी कापून काढली. त्यानंतर जॉनी बेयरस्टो (२५) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरल्याने इंग्लंडला दोनशेचा टप्पा ओलांडता आला नाही. हिंदुस्थानकडून हार्दिक पंडय़ाने सर्वाधिक ४ फलंदाज बाद केले. सिद्धार्थ कौलने २, तर दीपक चहर व उमेश यादव यांनी १-१ गडी बाद केला.