आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप – अभिषेक-ज्योतीचा अचूक बाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या खेळाडूंनी येथे पार पडलेल्या आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कास्य पदकांसह एकूण सात पदकांवर मोहोर उमटवत या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. अभिषेक वर्मा व ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीने मिश्रमधील कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. या जोडीने पटकावलेले सुवर्ण पदक हे हिंदुस्थानचे या स्पर्धेतील एकमेव सुवर्ण पदक ठरले हे विशेष.

अभिषेक वर्मा व ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीने अंतिम फेरीच्या लढतीत चीन तैपेईच्या ई ह्यूयॅन चेन व चिह लुह चेन या जोडीवर 158-151 अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. याआधी हिंदुस्थानच्या पुरुषांच्या संघाला कंपाऊंड प्रकारात कोरियाकडून हार सहन करावी लागल्यामुळे रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले होते.

निलंबित तरीही…

जागतिक तिरंदाजी संघटनेकडून हिंदुस्थानी संघटनेला निलंबनाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, मात्र तरीही हिंदुस्थानच्या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करीत पदकांची लूट केली. या स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडू न्यूट्रल म्हणजे तटस्थ झेंडय़ाखाली खेळताना दिसले. दरम्यान, ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

अखेरच्या संधीत यश

हिंदुस्थानसाठी सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अभिषेक वर्मा याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, हिंदुस्थानला या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याची अखेरची संधी होती, पण हवेचा अडथळा असल्यामुळे आव्हान समोर होते. मात्र आम्हाला यश संपादन करता आले. संघासाठी हे नक्कीच आनंददायी आहे. ज्योती सुरेखा वेन्नम यावेळी म्हणाली, अखेरच्या दोन्ही सामन्यांत चांगली गुणसंख्या नोंदवता आली. आम्ही सातत्यपूर्ण खेळ केल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झालाय.