अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफचा हिंदुस्थानला फटका, निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट

अमेरिकेन हिंदुस्थानवर लावलेल्या 50 टक्के टॅरिफचा थेट परिणाम दिसू लागला आहे. हिंदुस्थानचा निर्यातदर घटत असून मे महिन्यापासून अमेरिकेकडे होणाऱ्या हिंदुस्थानच्या निर्यातीत घट झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही घसरण अमेरिकन बाजारात हिंदुस्थानी वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे झाली आहे. टॅरिफ लागू झाल्यानंतर अमेरिकेत हिंदुस्थानी वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे.

थिंक टॅंक GTRI ने बुधवारी सांगितले की ट्रम्प सरकारने लावलेल्या उच्च टॅरिफमुळे अमेरिकेत स्थानिक वस्तूंच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत, ज्यामुळे हिंदुस्थानची अमेरिकेकडे होणारी निर्यात घटत आहे.

या अहवालानुसार, ऑगस्टमध्ये अमेरिकेकडे होणारी निर्यात 6.7 अब्ज डॉलरपर्यंत घसरली, जी जुलैच्या तुलनेत 16.3 टक्के कमी आहे. ही 2025 मधील सर्वात मोठी मासिक घसरण आहे, कारण महिन्याच्या शेवटी अमेरिकन टॅरिफ दुप्पट होऊन 50 टक्के झाले होते.

जूनच्या तुलनेत जुलैमध्ये निर्यात 3.6 टक्क्यांनी कमी होऊन 8 अब्ज डॉलरवर आली आहे. जून महिन्यातही मे च्या तुलनेत 5.7 टक्के घट होऊन ती 8.3 अब्ज डॉलर इतकी होती. मे 2025 हा वाढीचा शेवटचा महिना होता, कारण एप्रिलच्या तुलनेत अमेरिकेकडे निर्यात 4.8 टक्क्यांनी वाढून 8.8 अब्ज अमेरिकी डॉलर झाली होती. तर एप्रिलमध्ये अमेरिकेकडे निर्यात 8.4 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.

अमेरिकेने 7 ऑगस्ट रोजी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लावले होते. नंतर ट्रम्प यांनी ते वाढवून 27 ऑगस्टपासून 50 टक्के केले. अमेरिकेने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल हिंदुस्थानवर आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले आहे. हिंदुस्थानने रशियन तेल खरेदी करून युद्धात रशियाला मदत केली असा अमेरिकेने आरोप केला आहे. पण हिंदुस्थानने हा आरोप फेटाळून लावले आहेत.

अमेरिकेने फार्मास्युटिकल्स आणि स्मार्टफोनसह हिंदुस्थानच्या जवळपास एक तृतीयांश निर्यातींना टॅरिफमुक्त ठेवले आहे. तज्ज्ञांच्या मते वस्त्रोद्योग, दागिने, चामडे, कोळंबी आणि गालिचे यांसारखे क्षेत्र जास्त दबावाखाली आहेत आणि पुढे या क्षेत्रांना आणखी संकटाचा सामना करावा लागू शकतो. कारण अमेरिका या वस्तूंच्या जागतिक निर्यातीतील 30 ते 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाटा उचलतो.

GTRI च्या अंदाजानुसार, जर 2026 या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत 50 टक्के टॅरिफ कायम राहिले, तर भारताला अमेरिकेकडे होणाऱ्या निर्यातीत 30-35 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. हा एक मोठा धक्का असेल, कारण भारताच्या एकूण माल निर्यातीत जवळपास 20 टक्के हिस्सा अमेरिकेचा आहे.