हिंदुस्थानी हॉकी संघाचा सुरक्षित वातावरणात सराव सुरु

परदेश दौरा करून परतल्यामुळे विलगीकरण शिबिरात असलेले हिंदुस्थानी हॉकीपटू बंगुळुरु संकुलात सुरक्षित वातावरणात सराव करीत आहेत. टोकियो ऑलिम्पिक कधीही होवो, आम्ही उत्तम तयारी करतोय, असे हिंदुस्थानी पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने सांगितले. या सरावादरम्यान आमची सर्वोत्तम आरोग्य चाचणी आणि वैद्यकीय काळजी ‘साई’चे डॉक्टर्स घेत आहेत, असेही मनप्रीतने स्पष्ट केले.

परदेश दौरा करून परतल्याने हिंदुस्थानी पुरुष आणि महिला हॉकीपटू बंगुळुरु येथील हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रात क्वारंटाईन कक्षात आहेत. टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी हिंदुस्थानी पुरुष आणि महिलांनी सुरक्षित वातावरणात सरावाला सुरुवात केली आहे. साई केंद्राबाहेरील व्यक्तींसाठी सरावस्थळी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नियमित सराव सत्रात इमारतीव्यतिरिक्त हॉकीपटू आणि प्रशिक्षकांशिवाय कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही. कोरोनाचा आमच्या सरावावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही नियमितपणे आमचे हात धूत असून खेळाडूंच्या शरीराचे तापमानही वारंवार तपासले जात आहे. आम्हाला सुरक्षित वातावरणात सराव करता यावा, याची पूर्ण दक्षता ‘साई’ केंद्रातील अधिकारी घेत आहेत. प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही ऑलिम्पिकसाठी कसून सराव करत आहोत, असे मनप्रीत सिंग याने सांगितले.

आमच्या सरावात खंड पडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. हॉकी संघांना ऑलिम्पिकसाठी सराव करता यावा, यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत आहे. आम्ही सर्वजण आवश्यक खबरदारी घेत आहोत. आम्हाला आमचे उद्दिष्ट साध्य करता यावे, यासाठीच ‘साई’ पदाधिकारी मेहनत करत आहेत, असे हिंदुस्थानी महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या