‘आयपीएल’च्या आयोजनासाठी संघमालकांची धडपड; परदेशी खेळाडूंना एकांतवासात ठेवण्याची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लक्ष्मीची कृपादृष्टी असलेला ‘आयपीएल’चा टी-20 मेगा इव्हेंट आयोजनासाठी संघमालकांची धडपड सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा झाली नाही तर ‘बीसीसीआय’सह संघमालकांना कोटय़वधी रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे परदेशी क्रिकेटपटूंना 14 दिवस एकांतवासात ठेवण्याची तयारी संघमालकांनी दर्शवली आहे.

आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी जवळपास 90 टक्के जाहिराती मिळालेल्या आहेत. प्रक्षेपण हक्क आणि जाहिरातीमधून ‘बीसीसीआय’ व संघमालक यांना गडगंज पैसा मिळत असतो. या सर्व पैशांवर पाणी सोडायला ना ‘बीसीसीआय’ तयार ना संघमालक. सरकारने 31 मार्चनंतर ‘आयपीएल’मधील परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्याची परवानगी द्यायला हवी असे संघमालकांना वाटते. परदेशी खेळाडूंना एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात हिंदुस्थानात आणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 14 दिवस एकांतात ठेवण्याची आमची तयारी आहे, असा पर्यायही संघमालकांनी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मांडला. कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे ‘आयपीएल’ 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, मात्र हा जीवघेणा विषाणू लवकर अटोक्यात आला नाही तर ‘आयपीएल’ रद्द होते की काय? अशी धास्ती ‘बीसीसीआय’ व संघमालकांना सतावत आहे.