निवडणूक निकालापूर्वी शेअर बाजारात सुनामी, सेन्सेक्स 572 अंकांनी कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात गुरुवारी अक्षरशः सुनामी आली आणि सेन्सेक्स तब्बल 572 अंकांनी कोसळला. एका दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 2.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सेन्सेक्स 572 अंकांनी कोसळून 35,132 अंकांवर स्थिरावला तर निफ्टी 182 अंकांनी कोसळून 10,601 अंकांवर बंद झाला. बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, आयटी, ऑटोमोबाईल्स कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत. 5 डिसेंबरला मुंबई शेअर बाजाराचे भांडवली मूल्य 142 लाख कोटी रुपये इतके होते. 6 डिसेंबरला 139.72 लाख कोटी झाले आहे. एका दिवसात गुंतवणूकदारांचे 2.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

काय आहेत कारणे

  • चीनमधील व्यापारयुद्ध थांबण्याची अनिश्चितता, रुपयाचे अवमूल्यन या आर्थिक कारणांबरोबरच पुढील आठवड्यात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आहेत. तत्पूर्वी शेअर बाजारात पडसाद उमटले.
  • बाजारभावानुसार कर्जांवरील व्याजदर ठरविण्याचा रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.
  • ‘यूवाय’ या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीत आर्थिक घोटाळा झाला. कंपनीच्या ग्लोबल फायनान्शिअल अधिकाऱ्याला अटक झाली. त्यामुळे चीन, हाँगकाँगचा शेअर बाजार गडगडला. त्याचे पडसाद हिंदुस्थानातही उमटले. गुंतवणूकदारांनी ‘यूवाय’चे शेअर्स विक्रीचा सपाटा लावला.