
सामना ऑनलाईन | मॉस्को
रशियन नागरिकांचे हिंदुस्थान प्रेम सर्वानाच माहित आहे.रशियात हिंदुस्थानचे बॉलीवूड स्टार राज कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांचे लाखो फॅन्स आहेत. त्यामुळेच भले यंदाच्या फिफा विश्वचषकात हिंदुस्थानी संघ खेळत नसला तरी हिंदुस्थानी फुटबॉल शौकिनांचा मात्र रशियन नागरिक मोठया उत्साहात पाहुणचार करीत आहेत. “मी हिंदुस्थानातून आलोय” असे म्हटले कि रशियन या चाहत्यांसाठी जीव ओवाळून टाकायलाही तयार होतात. इतका हिंदुस्थानस्नेह रशियन नागरिकांत भरलेला दिसतो.
फिफा विश्वचषकाच्या लढतींसाठी रशियात आलेल्या हिंदुस्थानी फुटबॉल शौकिनांना अगदी घरच्या माणसासारखी वागणूक मिळतेय. हिंदुस्थानी सिनेमाचे आणि गाण्यांचे दिवाने बनलेले रशियन व्यापारी तर हिंदुस्थानी पर्यटकांसाठी खेळणी ,खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंच्या खरेदीत मोठी सूट देताना दिसत आहेत. सेंट पीटर्सबर्गचा एक स्थानिक व्यापारी म्हणाला , “मला हिंदुस्थान ,हिंदुस्थानी भोजन ,हिंदुस्थानी नागरिक आणि विशेष म्हणजे राज कपूर व मिथुन चक्रवर्तीसारख्या बॉलीवूड स्टार्सचे फार मोठे आकर्षण आहे.त्यामुळे हिंदुस्थानी नागरिक मला आमचेच वाटतात. त्यांना खरेदीत सूट देण्यात मला वेगळाच आनंद लाभतो”.
तरीही मोठ्या संख्येने हिंदुस्थानी रशियात
रशियाच्या एक टूर गाईडने दिलेली माहिती रंजक आहे. तो म्हणतो ,फिफा विश्वचषकात भले हिंदुस्थानी संघ खेळत नसला तरी यंदा मोठ्या संख्येने हिंदुस्थानी क्रीडा शौकीन रशियात आले आहेत. त्यामुळेच आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. हिंदुस्थानींशी आमचे नाते फार जवळचे आहे. म्हणून ते आम्हाला घरच्या माणसांसारखेच वाटतात. रशियात गेलेला एक हिंदुस्थानी म्हणतो, रशियात नेहमीच आमचे उत्साहात आणि प्रेमपूर्वक स्वागत होते .मग वर्ल्ड कप असो अथवा नसो.




























































