देशातील पहिले भूमिगत उच्चदाब वीज उपकेंद्र मुंबईत होणार; टाटा पॉवर परेल येथे उभारणार 400 केव्हीचे वितरण केंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण यंत्रणाही वाढवावी लागत आहे. मात्र मुंबईत जागेचा तुटवडा असल्याने देशातील पहिले भूमिगत उच्चदाब वीज उपकेंद्र परेल येथे टाटा पॉवर उभारणार आहे. हे 400 केव्हीचे सबमर्सिबल उपकेंद्र असणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना पूर आणि वादळासारख्या परिस्थितीतही अखंडित वीज पुरवठा करता येणार आहे.

वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी टाटा पॉवरकडून सातत्याने पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहे. त्यानुसार परेल येथे भूमिगत वीज उपकेंद्र उभारण्यात येणार असून त्याचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. हे उपकेंद्र टाटा पॉवरच्या परेल रिसिव्हिंग स्टेशनच्या पार्किंग लॉटच्या खाली भूमिगत असणार आहे. त्यामुळे कोणतीही अतिरिक्त जागा लागणार नाही. त्यामुळे लगतच्या भागांमधील गगनचुंबी इमारतींची विजेची मागणी पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये 2025 पर्यंत आणखी 10 भूमिगत सबमर्सिबल वीज उपकेंद्र उभारण्याची टाटा पॉवरची योजना आहे. त्यामुळे मुंबईतील टाटा पॉवरची वीज वितरण यंत्रणा मजबूत होणार आहे.