
जुने उकरून काढायची सवय या राज्य सरकारला लागलेली आहे, परंतु यांनी वेदांता फॉक्सकॉन का गेला? मेडिकल प्रकल्प, एअरबस प्रकल्प का गेला? याचे उत्तर सगळ्यात आधी दिले पाहिजे आणि असं कोणत्याही चौकशी केल्या तर काही फरक पडत नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम झालेलं आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.
राज्याचे उद्योगमंत्री अशा पद्धतीने चौकशी करत असतील तर चांगलंच आहे. यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, असे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
अकोळनेर येथे जाधव कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ते नगर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्यसचिव विक्रम राठोड, योगीराज गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी यावेळी उपस्थित होते.
दानवे म्हणाले की, महाराष्ट्रातील चार बडे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये गेले. हे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांची समितीमार्फत चौकशी करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली होती. त्यावर दानवे बोलत होते. त्यांनी चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे ते म्हणाले.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सगळ्या विभागातून राज्य सरकारकडे प्रस्ताव पोहोचलेले आहे, परंतु अजूनही सरकारने हे प्रस्ताव पूर्णपणे स्वीकारलेले नाही. अतिवृष्टीवेळी काही ठिकाणी मदत झाली काही ठिकाणी नाही. सरकार शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याबाबत संवेदन नसल्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले.
विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करत नाही, रिजेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. दहा दिवसात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी पंचनामा केला पाहिजे हे सगळं सरकार उघड्या डोळ्यांनी बघतंय हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.
राज्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. खानपट्ट्यांना परवानगी नसल्याने बेकायदेशीर उत्खनन होत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना ऐकायला मिळत आहे. याचा अर्थ अनाधिकृतपणे याची वाहतूक होत आहे. त्यामुळे अधिकृतरित्या या सर्व गोष्टी करण्याची गरज असल्याचं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले.
चार महिन्यांमध्ये सरकारचं कोणते ध्येय नाही. कोणते धोरण नाही. याला निश्चित येणाऱ्या अधिवेशनात आम्ही नक्कीच विरोध करू, असंही दानवे म्हणाले.
छत्रपती शिवरायांचा अवमान राज्यपालांनी केला. पुराने जमाने के आदर्श असं त्यांनी म्हटलं, काल परवा मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व शिवरायांच्या संदर्भातली तुलना केली त्यावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष व मुख्यमंत्री बोलले नाहीत. याचा अर्थ छत्रपती शिवरायांचा अवमान तुम्ही सहन करताय तुम्हाला ते मान्य आहे. उदयनराजेही वेगळ्या पद्धतीने बोलत आहेत. छत्रपती संभाजी राजेही बोलत आहेत. पण त्याचीही दखल सरकार घेत नाही. यामुळे महापुरुषांच्या बदनामीला राज्य सरकार आणि केंद्र सरकार पाठिंबा देत आहेत, का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांना मदत नाही
दरम्यान सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन महिने उलटूनही याबाबत अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानीची एक रुपयाची मदत सरकारने केली नाही. याबाबत सरकारचे लक्ष वेधले मात्र, शेतकऱ्यांना मदत दिली नाही, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.





























































