आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर्स कॉल कायम, आयसीसीच्या क्रिकेट समितीचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये पार पडलेल्या क्रिकेट मालिकेत एलबीडब्ल्यूसाठी मैदानातील पंचांकडून देण्यात येणाऱया ‘कॉल’वर टीका करण्यात आली. या मालिकेत डीसीजन रिव्यू सिस्टममुळेही (डीआरएस) वाद निर्माण झाले. याच कारणामुळे या नियमावर पुन्हा विचार करण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘अंपायर्स कॉल’ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण आयसीसीच्या क्रिकेट समितीने डीआरएसच्या तीन नियमांमध्ये बदल केले आहेत.

विकेट झोनची उंची वाढवली

पहिल्या नव्या नियमानुसार आता एलबीडब्ल्यूच्या रिह्यूसाठी विकेट झोनची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बेल्सच्या वरच्या भागापर्यंत विचार केला जाणार आहे. याआधी बेल्सच्या खालच्या भागातील उंचीपर्यंत विचार केला जात होता. त्यामुळे सुरुवातीला चेंडूचा 50 टक्के भाग बेल्सच्या खालच्या भागाला चिकटत असेल तर त्यावेळी ‘अंपायर्स कॉल’ दिला जात होता. पण आता चेंडूंचा 50 टक्के भाग हा बेल्सच्या वरच्या भागाला लागत असेल तरीही ‘अंपायर्स कॉल’ दिला जाणार आहे.

रिह्यूआधी खेळाडू पंचांना विचारणार

डीआरएसशी संबंधित आयसीसीकडून दुसरा नियम बदलण्यात आला आहे. मैदानातील पंचांच्या निर्णयावर रिह्यू घेण्याआधी खेळाडू सर्वप्रथम पंचांना विचारतील. फलंदाजाने चेंडू नीट खेळण्याचा प्रयत्न केला की नाही याबाबत खेळाडू पंचांना विचारू शकतील. असे झाल्यास रिह्यू घेण्यास सोपे जाईल. तसेच रिह्यू वायाही जाणार नाही.

शॉर्ट रनचा फैसला थर्ड अंपायर करणार

आयसीसीकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता शॉर्ट रनला निर्णय टीव्ही अंपायर अर्थातच थर्ड अंपायर (तिसरा पंच) घेतील. तिसरा पंच रिप्लेमध्ये समीक्षा करतील. काही चूक सापडल्यास पुढचा चेंडू टाकण्याआधी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल.