तेलंगणातील विद्यार्थ्यांचा ब्रिटनमध्ये अपघाती मृत्यू; गणेश विसर्जन करून घरी परतत असताना काळाचा घाला

ब्रिटनमध्ये भीषण अपघातात तेलंगणातील दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी आग्नेय इंग्लंडच्या एसेक्समध्ये रेले स्पर चौकात दोन कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात तेलंगणातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. चैतन्य तारे (23) आणि ऋषी तेजा रापोलू (21) अशी मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील चैतन्य जागीच ठार झाला, तर ऋषीचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. हे विद्यार्थी गणपती विसर्जन करुन घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला.

भरधाव कार चालवणाऱ्या पूर्व लंडनमधील दोघांना अटक करण्यात आली. मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. भरधाव कार चालवून दोघा तरुण मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी चालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एसेक्स पोलिसांनी ही कारवाईची माहिती दिली. स्थानिक न्यायालयाने दोन्ही आरोपी चालकांना 20 नोव्हेंबरपर्यंत जामिनावर सोडून दिले आहे. सध्या आम्ही अपघाताचा सखोल तपास करीत आहोत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्रिटनमधील नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अ‍ॅल्युमनी युनियनने विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.