घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद: रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर जिल्ह्यात घरफोडी

82

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अट्टल गुन्हे करणाऱ्यांमध्ये अनेक वेळा गुन्हा केला की एखादी खुणगाठ करण्याची पद्धत असते. अशीच एक आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे पथकाला यश आले आहेत. घरफोडी वा चोरी केल्यानंतर ही टोळी त्याठिकाणी दगड ठेवून पसार होत होती. या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे पथकाने लावला असून तीन आरोपींना मध्यप्रदेश येथून पकडले आहे. त्याच्याकडून 11 लाख 23 हजाराचे सोने, चांदी व चार मोटार सायकल असा माल जप्त केला आहे. रायगड सह रत्नागिरी, पुणे अहमदनगर येथे 15 घरफोडी व 6 चोरीचे असे 21 गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गुन्हे पथकाने सुनील लालसिंग मुझालदा (23), रा. घोर, जी.धार, रवी उर्फ छोटू मोहन डावर (18) रा. जवार, जी. इंदोर, कपिल गजेंद्र पांचोली उर्फ जैन (18) रा. बोरी, जी.अलीराजपुर या तीन आरोपींना मध्यप्रदेश येथून अटक केली आहे.

रायगड जिल्ह्यात विशेषतः दक्षिण भागात चोरी, घरफोडी या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हेगाराची गुन्हे करण्याची कार्यपद्धती, गुन्हे करण्याचे ठिकाण, दिवस, वेळ याचा आढावा घेऊन तपास सुरू केला. या आढावा मधून एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे दगड. चोरी वा घरफोडी केल्यानंतर ही टोळी त्याठिकाणी दगड म्हणून आपली छाप ठेवत होते. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातूनही या टोळीला शोधण्यात यश आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांच्या नेतृत्वाखाली अमोल हंबीर, प्रतीक सावंत सुनील खराडे, हनुमान सूर्यवंशी यांचे पथक तयार करून तपास सुरू केला. तपासमध्ये आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील धार, इंदोर, अलीराजपुर या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथक मध्यप्रदेश येथे जाऊन शिताफीने सुनील लालसिंग मुझालदा (23), रा. घोर, जी.धार, रवी उर्फ छोटू मोहन डावर (18) रा. जवार, जी. इंदोर, कपिल गजेंद्र पांचोली उर्फ जैन (18) रा. बोरी, जी.अलीराजपुर या तीन आरोपींना अटक केली.

मध्यप्रदेश येथून आणलेल्या तिन्ही आरोपीची चौकशी केली असता रायगडसह रत्नागिरी, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये 15 घरफोडी व 6 चोरी असे 21 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात अजून पाच आरोपी फरार आहेत. तीन आरोपिकडून 10 लाख 23 हजाराचे 31 तोळे सोने, 1 लाख किमतीची 300 ग्राम चांदी व 4 मोटार सायकल असा 11 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग करीत आहेत.

गुन्ह्याची पद्धत, दगड ही निशाणी
घरफोडीतील गुन्हेगार हे मध्यप्रदेशातील इंदोर मार्गे बसने धुळे, मार्गे अहमदनगर नंतर पुणे व घाट पार करून कोकणात येत होते. दिवसा नदीकिनारी वास्तव्य करून रात्री टोळीने घरफोडी करून चोरीचा ऐवज घेऊन तेथील मोटार सायकल चोरून मध्यप्रदेश कडे परत जात. या टोळीतील सदस्य दगड व कुऱ्हाड यासारख्या हत्यारांचा वापर करीत होते. घरफोडी वा चोरी केल्यानंतर त्याठिकाणी दगड ठेऊन पसार होत होते. अशी कार्यपद्धती ते गुन्हा करताना वापरत होते. 2017 मध्ये या टोळीने पेण शहरामध्ये घरफोडी केली होती. परंतु त्याचा शोध लागला नव्हता.

आपली प्रतिक्रिया द्या